लखनऊ : रोहित शर्माच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर दुसऱ्या टी-२०मध्ये भारतानं २० ओव्हरमध्ये १९५-२ एवढा स्कोअर केला आहे. रोहित शर्मानं ६१ बॉलमध्ये नाबाद १११ रनची खेळी केली. यामध्ये ८ फोर आणि ७ सिक्सचा समावेश आहे. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. पण भारताचे ओपनर रोहित शर्मा आणि शिखर धवननं १२३ रनची ओपनिंग पार्टनरशीप केली. शिखर धवननं ४३ रनची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर आलेला ऋषभ पंत ५ रनवर आऊट झाला. तर लोकेश राहुलनं १४ बॉलमध्ये नाबाद २६ रन केले. वेस्ट इंडिजकडून खेरी पिरे आणि फॅबियन अॅलेननं प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
वेस्ट इंडिजचा कर्णधार कार्लोस ब्रॅथवेटनं शेवटच्या ओव्हरमध्ये २० रन दिले. यातले १९ रन रोहितनं केले. ब्रॅथवेटच्या पहिल्या बॉलला १ रन काढून राहुलनं रोहितला स्ट्राईक दिला. यानंतर रोहितनं लागोपाठ ३ फोर आणि १ सिक्स मारले.
आता रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये ४ शतकं झाली आहेत. तर कर्णधार म्हणून हे रोहितचं दुसरं टी-२० आंतरराष्ट्रीय शतक आहे. २ शतकं करणारा तो एकमेव कर्णधार आहे. तर आता टी-२०मध्येही सर्वाधिक शतकं रोहितच्या नावावर आहेत.