मुंबई : पाचवेळा आयपीएलचं जेतेपद जिंकणारी मुंबई इंडियन्स यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडली आहे. सलग 8 सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर मुंबईसाठी प्लेऑफचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत मुंबईच्या टीमवर आणि कर्णधार रोहित शर्मावर सोशल मीडियावरून टीका करण्यात येतेय. यानंतर आता रोहित शर्माने एक ट्विट केलं असून यावेळी तो फार भावूक असल्याचं दिसून आलं आहे.
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमची कामगिरी फारच निराशाजनक आहे. मुंबईने आतापर्यंत 8 सामने खेळले असून एकाही सामन्यांत त्यांना विजय मिळवता आलेला नाही. रविवारी लखनऊ सुपर जाएंट्सविरूद्ध झालेल्या पराभवानंतर मुंबईच्या प्लेऑफबाबत होत्या नव्हत्या तेवढ्या सर्व आशा मावळल्या.
दरम्यान सोमवारी रोहित शर्माने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये रोहित म्हणतो, या टूर्नामेंटमध्ये आम्ही सर्वश्रेष्ठ कामगिरी केली नाही, मात्र असं होतं. खेळाच्या या जगात अनेक दिग्गज खेळाडू फेल झाले आहेत. पण माझं माझी टीम आणि त्यातील वातावरणावर प्रेम आहे. मी माझ्या शुभचिंतकांना धन्यवाद देतो, ज्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला.
We haven’t put our best foot forward in this tournament but that happens,many sporting giants have gone through this phase but I love this team and it’s environment. Also want to appreciate our well wishers who’ve shown faith and undying loyalty to this team so far @mipaltan
— Rohit Sharma (@ImRo45) April 25, 2022
आयपीएलच्या इतिहासातील एक यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माचं नाव घेतलं जातं. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या टीमने पाचवेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. मात्र यंदाच्या सिझनमध्ये सगळ्या गोष्टी फेल होताना दिसल्या. शिवाय मुंबई प्लेऑफमधून बाहेरही पडली आहे.