मुंबई : टीम इंडियाच्या बॅटिंग प्रशिक्षकपदी विक्रम राठोड यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. यानंतर लगेचच विक्रम राठोड यांनी ऋषभ पंतला इशारा दिला आहे. केयरलेस आणि फियरलेस शॉट यांच्यातलं अंतर समजणं गरजेचं असल्याचं वक्तव्य विक्रम राठोड यांनी केलं आहे. याआधी रवी शास्त्री यांनीही ऋषभ पंतच्या शॉट निवडीबाबत नाराजी व्यक्त केली होती.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी टी-२० मॅच मोहालीमध्ये खेळवली जाणार आहे. या मॅचआधी विक्रम राठोड यांनी माध्यमांशी बातचित केली. टीमच्या वातावरणात एकरुप होण्यासाठी मला जास्त अडचण येणार नाही, पण थोडा वेळ लागेल, असं राठोड यांनी सांगितलं.
'प्रत्येक युवा क्रिकेटपटूला न घाबरता खेळलं पाहिजे, पण त्यांनी निष्काळजीपणे खेळता कामा नये. टीम प्रशासन पंतकडून अशाच खेळाची अपेक्षा करत आहे. ही गोष्ट समजण्याइतका पंत हुशार आहे,' अशी प्रतिक्रिया राठोड यांनी दिली.
याआधी टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही ऋषभ पंतला इशारा दिला होता. जबाबदारी दाखव, अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, असं रवी शास्त्री पंतला म्हणाले होते. कौशल्य असो वा नसो, ऋषभ पंत असे शॉट खेळून फक्त स्वत:लाच नाही, तर टीमलाही निराश करत आहे, असं वक्तव्य शास्त्रींनी केलं होतं.