वर्ल्डकपआधी या २ खेळाडूंची ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटच्या सामन्यात अग्निपरीक्षा

वर्ल्डकप आधी टीम इंडियाची अग्निपरीक्षा

Updated: Mar 13, 2019, 11:15 AM IST
वर्ल्डकपआधी या २ खेळाडूंची ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटच्या सामन्यात अग्निपरीक्षा title=

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या वनडे सिरीजमधला पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे. दोन्ही ही संघ २-२ ने बरोबरीवर आहेत. भारतावर घरच्या मैदानावर सिरीज जिंकण्याचा दबाव असेल. भारतीय टीमला आगामी वर्ल्डकपच्या आधी काही प्रश्नांची उत्तर देखील या सिरीजमधून मिळतील. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-२० सिरीजमध्ये चांगली कामगिरी करणारा केएल राहुल शेवटच्या सामन्यात कशी कामगिरी करतो यावरुन त्याची वर्ल्डकपमधली जागा निश्चित होणार आहे. चौथ्या वनडेमध्ये शिखर धवन आणि रोहित शर्माने जबरदस्त खेळी केली. पण केएल राहुल अजूनही फॉर्ममध्ये नाही. शेवटच्या वनडेत राहुलला वर्ल्डकपमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी आज चांगली कामगिरी करावी लागेल.

दुसरीकडे टीम इंडियाचा एक्स फॅक्टर असणारा ऋषभ पंतची कीपिंग टीम इंडियासाठी थोडी डोकेदुखी ठरते आहे. मागच्या सामन्यात पंतला कीपर म्हणून चांगली कामगिरी करता आली नाही. ३५८ रन केल्यानंतरही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पंत शेवटच्या सामन्यात कशी कामगिरी करतो यावर त्याचं वर्ल्डकपमधील स्थान निश्चित होऊ शकतं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोटला वनडेमध्ये या दोन्ही खेळाडूंची अग्निपरीक्षा असणार आहे. 

पाचव्या आणि शेवटच्या वनडेमध्ये शिखर आणि रोहित ही जोडी पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. तिसऱ्या नंबरवर के एल राहुल बॅटींग करण्यासाठी येऊ शकतो. अंबाती रायडू या सामन्यात टीमला ड्रिंक्स देतानाच दिसेल. पंत पाचव्या स्थानी बॅटींग करण्यासाठी येऊ शकतो. पंतची बॅटींग आणि कीपिंग दोन्हीवर निवड समितीचं लक्ष असेल. पंतच्या खराब कामगिरीमुळे वर्ल्डकपमध्ये विकेटकीपर धोनीला पर्याय म्हणून पंत ऐवजी दिनेश कार्तिकला संधी मिळू शकते.