म्हणून पोलार्ड-ब्राव्होनं ४०० नंबरची जर्सी घातली

चेन्नईविरुद्धच्या रोमहर्षक मॅचमध्ये मुंबईचा १ विकेटनं पराभव झाला.

Updated: Apr 10, 2018, 06:09 AM IST
म्हणून पोलार्ड-ब्राव्होनं ४०० नंबरची जर्सी घातली  title=

मुंबई : चेन्नईविरुद्धच्या रोमहर्षक मॅचमध्ये मुंबईचा १ विकेटनं पराभव झाला. या मॅचमध्ये ड्वॅन ब्राव्हो चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. ब्राव्होनं ३० बॉलमध्ये ६८ रन्सची खेळी केली. या मॅचमध्ये ब्राव्हो आणि पोलार्ड यांच्या जर्सीवर ४०० क्रमांक होता.

टी-20 क्रिकेटमध्ये विक्रम केल्यामुळे या दोघांनी ४०० क्रमांकाची जर्सी घातली होती. पोलार्डनं आत्तापर्यंत ४१४ टी-20 खेळल्या आहेत. या टी-20मध्ये त्यानं ८,०४८ रन्स आणि २५१ विकेट घेतल्या आहेत. ८९ हा पोलार्डचा सर्वाधिक स्कोअर आहे.

पोलार्डबरोबरच ब्राव्होनंही ४०० क्रमांकाची जर्सी घातली होती. टी-20 क्रिकेटमध्ये ब्राव्होच्या ४०० विकेट पूर्ण झाल्यामुळे त्यानंही ४०० क्रमांकाची जर्सी घातली होती. टी-20मध्ये ४०० विकेट घेणारा ब्राव्हो हा एकमेव खेळाडू आहे. तर ४०० टी-20 खेळणारा पोलार्ड हा पहिलाच खेळाडू आहे. २ मॅचनंतर आम्ही ४७ आणि ५५ क्रमांकची जर्सी पुन्हा घालून, असं पोलार्डनं सांगितलं आहे.

चेन्नईनं मुंबईला हरवलं

पहिल्याच मॅचमध्ये चेन्नईनं मुंबईवर रोमहर्षक विजय मिळवला. शेवटच्या बॉलवर एक विकेट राखून चेन्नईनं मुंबईला पराभूत केलं. चेन्नईच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते ड्वॅन ब्राव्हो आणि केदार जाधव. ब्राव्होनं ३० बॉल्समध्ये ६८ रन्सची खेळी केली तर केदार जाधवनं २२ बॉल्समध्ये २४ रन्स केले.

दुखापतग्रस्त जाधवची शानदार खेळी

या मॅचमध्ये केदार जाधवच्या मांडीला दुखापत झाली. यानंतर जाधवला मैदान सोडून जावं लागलं. अखेर ९ विकेट पडल्यानंतर जाधव पुन्हा बॅटिंगला आला. शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी ७ रन्सची आवश्यकता होती. पण केदार जाधवला दुखापत झाल्यामुळे तो धावून एकही रन काढू शकत नव्हता. मुस्तफिजूर रहमानच्या शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या तिन्ही बॉलला केदार जाधवला एकही रन काढता आली नाही. पण ओव्हरच्या चौथ्या बॉलला जाधवनं सिक्स आणि पाचव्या बॉलला फोर मारून चेन्नईला जिंकवून दिलं.

एक चूक मुंबईला पडली महाग

बॅटिंगला आलेला असतानाच्या पहिल्याच बॉलला केदार जाधव आऊट होता. मयांक मार्कंडेयच्या बॉलिंगवर केदार जाधवच्या पायाला बॉल लागला. मुंबईच्या टीमनं याबाबत अपीलही केलं, पण अंपायरनं त्याला आऊट दिलं नाही. रिप्ले बघितल्यावर केदार जाधव आऊट असल्याचं लक्षात आलं. यावेळी मुंबई इंडियन्सनं डीआरएस घेतला असता तर मॅचच चित्रच पलटून गेलं असतं. यावेळी चेन्नईचा स्कोअर ६.४ ओव्हरमध्ये ४३/३ असा होता.