मोहाली : के.एल.राहुलनं केलेल्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर पंजाबनं दिल्लीचा ६ विकेटनं पराभव केला आहे. दिल्लीनं ठेवलेल्या १६७ रन्सचा पाठलाग करताना पंजाबनं १८.५ ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून १६७ रन्स केल्या. राहुलच्या अर्धशतकाबरोबरच करुण नायरनं ३३ बॉल्समध्ये ५० रन्स केले. तर डेव्हिड मिलरनं २३ बॉल्समध्ये नाबाद २४ आणि मार्कस स्टॉयनीसनं १५ बॉल्समध्ये २२ रन्स केले.
या मॅचमध्ये के.एल.राहुलनं भारतीय टी-20 लीगमधलं सर्वात जलद अर्धशतक झळकावलं आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या मॅचमध्ये राहुलनं फक्त १४ बॉल्समध्येच अर्धशतक केलं. १६ बॉल्समध्ये ५१ रन्स करून राहुल आऊट झाला. राहुलच्या इनिंगमध्ये ६ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता.
यंदाच्या मोसमातला पंजाबचा हा पहिलाच विजय होता. या विजयानंतर पंजाबच्या टीमची मालक प्रिती झिंटा आणि पंजाबचा खेळाडू क्रिस गेलनं मैदानात डान्स करून सेलिब्रेशन केलं. या मॅचमध्ये क्रिस गेलला संधी देण्यात आली नव्हती. लिलावामध्ये सुरुवातीला क्रिस गेलला कोणत्याच टीमनं विकत घेतलं नव्हतं. अखेर पंजाबनं गेलवर बोली लावली.