पुलवामा हल्ला : पाकिस्तानला एकदाच शेवटचा धडा शिकवा; चहल संतापला

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले.

Updated: Feb 20, 2019, 05:46 PM IST
पुलवामा हल्ला : पाकिस्तानला एकदाच शेवटचा धडा शिकवा; चहल संतापला title=

मुंबई : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारतामध्ये पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. भारताच्या अनेक क्रिकेटपटूंनी पुलवामामध्ये झालेल्या या हल्ल्याचा निषेध केला आहे. तर काही खेळाडू आणि प्रशासकांनी वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर बहिष्कार घालावा अशी मागणी केली आहे. १६ जूनला भारत आणि पाकिस्तानमध्ये वर्ल्ड कपची मॅच नियोजित आहे. भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलनंही पुलवामा हल्ल्याबद्दल त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

युझवेंद्र चहल म्हणाला, 'वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळायचं का नाही, हा निर्णय भारत सरकार आणि बीसीसीआयनं घ्यायचा आहे. एक-दोन खेळाडू याबद्दल निर्णय घेऊ शकत नाहीत. पण आता पाकिस्तानला एकदाच शेवटचा धडा शिकवण्याची वेळ आली आहे. दहशतवाद पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.'

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नका, हरभजनची मागणी

'एकदाच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावा. प्रत्येकवेळी आम्ही हे सहन करू शकत नाही. प्रत्येक तीन महिन्यानंतर जवान शहीद होत आहेत. गोष्टी होण्यासाठी आम्ही प्रत्येकवेळी थांबू शकत नाही. आपण गोष्टी घडवून आणल्या पाहिजेत. एकदाच या गोष्टी निकाली काढा, मग ती आर-पारची लढाई असली तरी चालेल', असं वक्तव्य चहलनं इंडिया टुडेशी बोलताना केलं.

२८ वर्षांचा युझवेंद्र चहलची भारताच्या वर्ल्ड कप टीममधली निवड निश्चित मानली जात आहे. चहलनं ४० वनडेमद्ये ७१ विकेट आणि २९ टी-२०मध्ये ४५ विकेट घेतल्या आहेत. वर्ल्ड कपआधी भारत शेवटची सीरिज ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. या सीरिजमध्ये चहलची निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला २४ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया २ टी-२० आणि ५ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे.

..तर वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना नाही