INDvsAUS: हेडन म्हणतो; 'पांड्यापेक्षा स्टॉयनिस भारी'

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला २४ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

Updated: Feb 20, 2019, 05:11 PM IST
INDvsAUS: हेडन म्हणतो; 'पांड्यापेक्षा स्टॉयनिस भारी' title=

मुंबई : ऑलराऊंडर म्हणून हार्दिक पांड्यापेक्षा मार्कस स्टॉयनिस चांगला आहे, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडननं केलं आहे. २४ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. याआधी हेडननं या सीरिजबद्दलची आपली मतं मांडली. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स भारताचा ओपनर शिखर धवनला वनडे आणि टी-२० सीरिजमध्ये त्रास देईल, असं हेडनला वाटतं. भारत दौऱ्यामध्ये ऑस्ट्रेलिया सुरुवातीला २ टी-२० आणि मग ५ वनडे मॅचची सीरिज खेळेल.

'मार्कस स्टॉयनिस हा जगातला सर्वोत्तम ऑलराऊंडर होण्याच्या प्रक्रियेतून जात आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये आणखी संधी मिळत नसलेला स्टॉयनिस कमनशिबी आहे. स्टॉयनिसच्या खेळात गुणवत्ता आहे. हार्दिक पांड्याही चांगला ऑलराऊंडर आहे, पण दोघांची तुलना केली तर मला स्टॉयनिस सर्वोत्तम वाटतो', असं वक्तव्य हेडननं केलं.

'या सीरिजमध्ये पॅट कमिन्स त्याचा वेग, बाऊन्सर, रिव्हर्स स्विंग आणि स्लो बॉलमुळे शिखर धवनला त्रास देईल,' असं हेडन म्हणाला.

मॅथ्यू हेडननं भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलचं मात्र कौतुक केलं आहे. या सीरिजमध्ये मॅक्सवेल आणि युझवेंद्र चहलमध्ये लढाई रंगेल, पण या लढाईत चहल जिंकेल. भारतामध्ये खेळताना मॅक्सवेलला संघर्ष करावा लागला आहे. आयपीएलमध्येही मॅक्सवेलला यश आलेलं नाही. तर चहलची वाटचाल जगातला सर्वोत्तम स्पिनर होण्याकडे सुरू आहे. मॅक्सवेल मधल्या फळीमध्ये बॅटिंगला येतो. यावेळी चहल बॉलिंग टातत असतो, त्यामुळे चहल मॅक्सवेलला भारी पडेल, असं हेडन म्हणाला. २८ वर्षांच्या युझवेंद्र चहलनं ४० वनडेमद्ये ७१ विकेट आणि २९ टी-२०मध्ये ४५ विकेट घेतल्या आहेत.