...तर द्रविडची प्रशिक्षक पदावरुन गच्छंती निश्चित! टीम इंडियाचा कोच म्हणून 'ही' 2 नावं चर्चेत

Indian Cricket Team Coach: भारतीय संघाने वर्ल्ड कप 2023 मध्ये द्रविडच्या प्रशिक्षणाअंतर्गत पहिले पाचही सामने जिंकले असून मागील 2 वर्षांपासून द्रविड भारतीय संघासोबत प्रशिक्षण म्हणून काम करतोय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 27, 2023, 02:26 PM IST
...तर द्रविडची प्रशिक्षक पदावरुन गच्छंती निश्चित! टीम इंडियाचा कोच म्हणून 'ही' 2 नावं चर्चेत title=
मागील 2 वर्षांपासून द्रविड भारतीय संघाचा प्रशिक्षक आहे

Indian Cricket Team Coach: आयसीसी वर्ल्ड कप 2023 च्या आधी आपल्या पाचही सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवून देत प्रशिक्षक राहुल द्रविड जेतेपदावर दावेदारी सांगणाऱ्या संघाचे प्रशिक्षक म्हणून नक्कीच समाधानी असतील यात शंका नाही. भारतीय संघाची कामगिरी पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विरोधी संघाविरोधात दमदार कामगिरी केली. द्रविडच्या प्रशिक्षणामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ आयसीसी वर्ल्ड कप 2023 च्या राऊंड-रॉबिनच्या फेरीत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा पराभूत करुन पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे.

विजयाचा दुष्काळ संपवण्याची संधी

2011 नंतर भारत वर्ल्ड कप जिंकलेला नाही. या विजयासहीत आयसीसी स्पर्धांमधील विजयाचा दुष्काळ संपुष्टात आणण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. द्रविडच्या खांद्यावर संघाला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र द्रविडचं कॉन्ट्रॅक्ट या वर्ल्ड कपनंतर संपुष्टात येत आहे. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्येही पोहोचला भारत

द्रविड हा माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्यानंतरनंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून रुजू झाला. त्यापूर्वी शास्त्रींच्या प्रशिक्षणाखाली  आयसीसीच्या टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारत पराभूत होऊन बाहेर पडला होता. भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्याही अंतिम सामन्याप्रयंत पोहोचलेला.

2 वर्षांचा कार्यकाळ होतोय पूर्ण

वर्ल्ड कपनंतर द्रविडच्या प्रशिक्षक पदाचा 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे द्रविडला करार वाढवून दिला जाणार की नवीन व्यक्तीला बीसीसीआय संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. द्रविडच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कपआधी भारताने ऑस्ट्रेलियाला 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने धूळ चारली होती.

या सर्वांना विश्रांती

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार भारताचा माजी फलंदाज व्ही. व्ही. एस लक्ष्मण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. द्रविडला वर्ल्ड कपनंतरच्या पहिल्या मालिकेसाठी विश्रांती दिली जाईल. विराट कोहली, के. एल. राहुल, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराहलाही विश्रांती दिली जाईल. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी असलेल्या व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने नेहमीच द्रविडच्या अनुपस्थितीत भारताचा प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे.

प्रमुख दावेदार कोण?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीयाकडे पुन्हा प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याचा पर्याय द्रविडकडे आहे. द्रविडचा करार संपल्यानंतर बीसीसीआयने नवीन अर्ज मागवले तर व्ही. व्ही. एस. लक्ष्मण प्रशिक्षक पदाचा प्रमुख दावेदार असेल. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख म्हणून सितांशु कोटक यांना फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून नेमलं जाण्याची शक्यता आहे.