KL Rahul Breaks Silence On Strike Rate Talk: लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार के. एल. राहुलने त्याच्या स्ट्राइक रेटवरुन सुरु असलेल्या चर्चांवर अखेर भाष्य केलं आहे. टी-20 क्रिकेटमधील के. एल. राहुलचा स्ट्राइक रेट हा मागील काही काळापासून चर्चेचा विषय ठरत आहे. खास करुन आयपीएल 2024 मध्ये हा विषय चांगलाच चर्चेत असून राहुलवर यावरुन टीका केली जात आहे. 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल 5 फलंदाजांमध्ये राहुलचा समावेश असताना अशी टीका होत असल्याबद्दल अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अशातच के. एल. राहुलला जून महिन्यात सुरु होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपच्या भारतीय संघातून वगळण्यात आलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघात राहुलला स्थान देण्यात आलेलं नाही.
रोहित शर्मा आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी संघाची घोषणा करताना आयोजित पत्रकार परिषदेमध्ये संघाचा समतोल साधण्यासाठी मधल्या फळीतील फलंदाजांची गरज होती. त्यातही विकेटकीपर बॅट्समन हवा असल्याने ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना के. एल. राहुलऐवजी प्राधान्य देत संघात स्थान देण्यात आल्याचं रोहित आणि आगरकर यांनी स्पष्ट केलं.
के. एल. राहुलने सामन्याच्या सुरुवातीला टॉस जिंकल्यानंतरच सूचक पद्धतीने स्ट्राइक रेटवरुन होणाऱ्या टीकेवर भाष्य केलं. टॉस जिंकल्यानंतर के. एल. राहुलने, "आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. मला खेळपट्टीसंदर्भात फारसं कळत नाही. मात्र आम्हाला धावांचा पाठलाग करायला आवडेल. चांगली बाब ही आहे की आम्ही परिस्थितीशी उत्तमरित्या जुळवून घेत आहोत. आमच्या संघातील काही खेळाडूंनी उत्तम वैयक्तिक कामगिरी करत संघाला विजय मिळवून देण्यात मदत केल्याचं पाहायला मिळालं आहे. सध्या स्ट्राइक रेटबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. मागील काही वर्षांमध्ये टी-20 क्रिकेटमध्ये मोठ्याप्रमाणात बदल झाले आहेत," असं के. एल. राहुल म्हणाला.
दरम्यान, काल झालेल्या लखनऊविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यात कोलकात्याच्या संघाने 98 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासहीत कोलकात्याच्या संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. दुसरीकडे मोठ्या फरकाने पराभव झाल्याने लखनऊच्या संघाला नेट रनरेटमध्ये मोठा फटका बसला आहे. कोलकात्याने प्रथम फलंदाजीचं आमंत्रण स्वीकारत 20 ओव्हरमध्ये 235 धावा केल्या. सहा विकेट्सच्या मोबदल्यात त्यांनी एवढी मोठी मजल मारली. 200 हून अधिक धावांचा पाठलाग करताना लखनऊच्या संघाचा डाव गडगडला आणि संपूर्ण संघ 16.1 ओव्हरमध्येच तंबूत परतला. लखनऊच्या संघा 137 धावांवर बाद झाला. कोलकात्याकडून सुनिल नारेनने सर्वाधिक 81 धावा केल्या.