Corona : पाकिस्तानच्या महान खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. 

Updated: Mar 30, 2020, 03:56 PM IST
Corona : पाकिस्तानच्या महान खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू title=

लंडन : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे जगात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानचे महान खेळाडू आझम खान यांचंही कोरोनामुळे निधन झालं आहे. १९६०च्या दशकातले सर्वोत्तम स्क्वॉश खेळाडू अशी ओळख असणाऱ्या आझम खान यांनी लंडनच्या हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. आझम खान हे ९५ वर्षांचे होते. १९६०च्या दशकात आझम खान यांनी पाकिस्तान सोडलं आणि ते इंग्लंडमध्ये स्थायिक झाले.

पाकिस्तानच्या टीव्ही चॅनलने दिलेल्या वृत्तानुसार आझम खान यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे एक आठवड्यापूर्वी त्यांना एलिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हॉस्पिटलमध्ये टेस्ट केल्यानंतर आझम खान यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. 

कोरोनामुळे जगभारत ३४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये १६ जणांना या व्हायरसमुळे जीव गमवावा लागला आहे. आझम खान हे स्क्वॉशच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक होते. १९५९ ते १९६२ पर्यंत आझम खान यांनी लागोपाठ ब्रिटिश ओपन स्पर्धा जिंकली, तर १९६२मध्ये त्यांनी यूएस ओपनमध्येही विजय मिळवला होता. 

१९६२ साली दुखापत आणि १४ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूनंतर आझम खान खेळापासून लांब झाले. दोन वर्षानंतर आझम खान दुखापतीतून बरे झाले, पण मुलाच्या मृत्यूच्या दु:खातून ते सावरू शकले नाहीत. 

आझम खान यांचा भाऊ हाशीम खान पाकिस्तानचे पहिले स्क्वॉश खेळाडू होते, ज्यांनी ब्रिटिश ओपन स्पर्धा जिंकली. हाशीम खान यांनी १९५१ साली हा विजय मिळवला होता. हाशीम खान यांनी ७ वेळा ब्रिटिश ओपन चॅम्पियनशीपवर आपलं नाव कोरलं होतं.