मुंबई : क्रिकेटमधला सगळ्यात मोठा सामना म्हणून भारत आणि पाकिस्तानच्या मॅचचा नेहमीच उल्लेख होतो. भारत-पाकिस्तानमधले संबंध खराब झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षात या दोन्ही टीम फक्त आयसीसीच्या स्पर्धा आणि आशिया कपमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. या सगळ्या स्पर्धांमध्ये भारताचं पाकिस्तानविरुद्धचं रेकॉर्ड कायमच सर्वोत्तम राहिलं आहे. पण या दशकातल्या टी-२० मॅचमध्ये पाकिस्तानने भारताला अगदी थोड्या फरकाने मात दिली आहे.
२०१० ते २०१९ या कालावधीमध्ये पाकिस्तानने सर्वाधिक टी-२० मॅच जिंकल्या आहेत. या १० वर्षांमध्ये पाकिस्तानने १२२ मॅच खेळल्या यातल्या ६९ मॅचमध्ये पाकिस्तानचा विजय झाला. दुसरीकडे भारताने या दशकात १०६ टी-२० मॅच खेळल्या, यातल्या ६८ मॅच भारताने जिंकल्या. म्हणजेच पाकिस्तानला भारतापेक्षा फक्त १ टी-२० मॅच जास्त जिंकता आली आहे. सर्वाधिक टी-२० मॅच जिंकण्याच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतानंतर ऑस्ट्रेलियाने ५४, अफगाणिस्तानने ५३ आणि दक्षिण आफ्रिकेने ५१ टी-२० मॅच जिंकल्या. पाकिस्तानने भारतापेक्षा १ मॅच जास्त जिंकली असली तरी पाकिस्तानने भारतापेक्षा १६ मॅच जास्त खेळल्या आहेत. म्हणजेच विजयाची टक्केवारी ही पाकिस्तानपेक्षा भारताचीच जास्त आहे. मागच्या १० वर्षात भारताने ६५.३८ टक्के मॅच जिंकल्या, तर पाकिस्तानला ५७.८५ टक्के मॅच जिंकता आल्या.
मागच्या दशकात अफगाणिस्तानची विजयी टक्केवारी भारतापेक्षा जास्त राहिली. अफगाणिस्तानने ६७.९४ टक्के मॅच जिंकल्या. पण अफगाणिस्तानचे बहुतेक विजय हे कमजोर टीमविरुद्ध आले. दुसरीकडे भारताने मिळवलेले सगळे विजय हे टेस्ट खेळणाऱ्या टीमविरुद्धचे आहेत.
२०१० ते २०१९ या कालावधीमध्ये ४ टी-२० वर्ल्ड कप खेळवले गेले. पण यातला एकही वर्ल्ड कप भारत किंवा पाकिस्तानला जिंकता आला नाही. वेस्ट इंडिजच्या टीमने २०१२ आणि २०१६ सालचा टी-२० वर्ल्ड कप जिंकला. तर २०१० साली इंग्लंडने आणि २०१४ साली श्रीलंकेने वर्ल्ड कप पटकावला. भारताने मागच्या दशकात २००७ सालचा पहिला आणि पाकिस्तानने २००९ सालचा दुसरा वर्ल्ड कप जिंकला होता.
२०१९ या वर्षात भारताने १६ पैकी ९ टी-२० मॅच जिंकल्या, तर ७ मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला. टेस्ट खेळणाऱ्या देशांपैकी फक्त आयर्लंडलाच भारतापेक्षा जास्त १३ मॅच जिंकता आल्या. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानने प्रत्येकी ७-७ मॅच जिंकल्या. २०१९ हे वर्ष पाकिस्तानसाठी खराब राहिलं. या वर्षात खेळलेल्या १० टी-२० मॅचपैकी फक्त एकच मॅच पाकिस्तानला जिंकता आली.