India vs Pakistan Asia Cup : आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेच्या 15व्या हंगामातील दुसरा सामना आज रविवारी (28 ऑगस्ट) भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये सांयकाळी ७.३० वाजता खेळला जाणार आहे. या सामन्याआधीपासूनच क्रिकेटविश्वातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. असे असताना पाकिस्तानचे सर्व खेळाडू आपल्या दंडाला काळ्या फिती बांधून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं कारण पाकिस्तानकडून स्पष्ट देखील करण्यात आले.
भारत-पाक यांच्यात आज दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये लढत होणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ अनेक दिवसांपासून कसून सराव करत आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानी संघ आशिया चषक स्पर्धेत सहभागी झालेला असला तरी पाकिस्तानमध्ये मात्र पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. याच पुरग्रस्तांसोबत आहोत, असा संदेश देण्यासाठी पाकिस्तानचे खेळाडू दंडाला काळ्या फिती लावून मैदानात उतरणार आहेत.
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा (KP), बलुचिस्तान आणि सिंध प्रांतात पुराने अक्षरश: थैमान घातले आहे. पुरामुळे येथे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पुरासोबतच या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. पुरामुळे खैबर पख्तुनख्वा या भागात नागरिकांची घरं तसेच बँका वाहून गेल्या आहेत. तर बलुचिस्तानचा पाकिस्तानशी संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच कारणामुळे पूरग्रस्तांचे सांत्वन करण्यासाठी तसेच अशा परिस्थितीत पूर्ण पाकिस्तान तुमच्यासोबत आहे, हा संदेश देण्यासाठी पाकिस्तानी खेळाडू भारताविरोधातील सामन्यात दंडाला काळ्या फिती लावणार आहेत.
बाबर यांनी पूरग्रस्तांसाठी प्रार्थनाही केली
सामन्याच्या एक दिवस आधी बाबर आझमन यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानातील पुराबद्दलही भाष्य केले. पूरग्रस्तांना मदत करण्याचे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही त्यांनी केले. आपल्या देशासाठी हा कठीण काळ असल्याचे बाबर म्हणाले होते. आम्ही सर्व पूरग्रस्तांसाठी प्रार्थना करत आहोत.
पुरात एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू
सध्याची पाकिस्तानमधील भौगोलिक स्थिती भयानक आहे. तेथे 3 कोटींपेक्षा अधिक लोक बेघर झाली आहेत. जवळपास 1000 पेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडली आहेत. तर पाच लाखांपेक्षा अधिक घरे उधवस्त झाली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक, जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे.
भारताने 7 वेळा आशिया कप जिंकला
आशिया चषक पहिल्यांदा 1984 मध्ये आयोजित करण्यात आला होता. भारताने सर्वाधिक 7 वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर दुसरा यशस्वी संघ श्रीलंका आहे, जो 5 वेळा चॅम्पियन होता. त्याचबरोबर पाकिस्तानने दोन वेळा आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे. दोन वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये (ODI आणि T20) आशिया कप जिंकणारा भारत हा एकमेव संघ आहे. यावेळीही आशिया चषक टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे, ज्यामध्ये आशिया कपमध्ये 6 संघ सहभागी होत आहेत.