मुंबई : आशिया कप 2022 च्या सिझनमध्ये आज दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. या शानदार सामन्याची सर्व फॅन्स आतुरतेने वाट पाहतायत. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. टीम इंडिया टी-20 वर्ल्डकपच्या ऐतिहासिक पराभवाचा वचपा काढणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या सामन्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आपल्या प्लेइंग-11 मध्ये बरेच बदल करू शकतो. माजी कर्णधार विराट कोहली 41 दिवसांच्या विश्रांतीनंतर आणि केएल राहुलच्या शस्त्रक्रियेनंतर कमबॅक करतोय. अशा स्थितीत त्याला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळण्याची खात्री आहे.
रोहितसोबत राहुल सलामीा उतरू शकतो. तर कोहली तिसऱ्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे. यानंतर मधल्या फळीची जबाबदारी सूर्यकुमार यादवसह हार्दिक पांड्याकडे दिली जाऊ शकते. मात्र याठिकाणी विकेटकीपर फलंदाज म्हणून कोणाचा टीममध्ये समावेश होतो याकडे सर्वाचं लक्ष आहे.
कर्णधार रोहित त्याच्या प्लेइंग-11 मध्ये ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यापैकी एकाला बेंचवर बसवण्याची शक्यता आहे. त्यानंतर फिरकीपटू रवींद्र जडेजाला सातव्या क्रमांकावर संधी मिळणं जवळपास निश्चित आहे.
दुसरा स्पिनर म्हणून युझवेंद्र चहलही खेळणार असल्याचं निश्चित आहे. या सामन्यात रोहित शर्मा तिसऱ्या स्पिनरचा विचार केल्यास रविचंद्रन अश्विनलाही संधी मिळू शकते. अन्यथा त्यांच्या जागी आवेश खानला टीममध्ये जागा मिळेल. भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग हे दोन वेगवान गोलंदाज राहू शकतात. पांड्यासह एकूण 4 वेगवान गोलंदाज या सामन्यात उतरू शकतात.