Pakistan Wicketkeeper Viral Video: पाकिस्तानी क्रिकेट संघाचा विकेटकीपर आझम खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. कधी वजनामुळे तर कधी मैदानामधील ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे हा क्रिकेटपटू कायमच चर्चेत राहिला आहे. सध्या तो चर्चेत येण्यामागील कारण ठरलं आहे त्याचं अगदी विचित्र पद्धतीने बाद होणं. सध्या पाकिस्तानचा हा क्रिकेटपटू कॅरेबियन प्रिमिअर लीगमध्ये खेळतोय. याच स्पर्धेत तो चक्क गळ्याला बॉल लागल्याने बाद झाला आहे.
झालं असं की, कॅरेबियन प्रिमीअर लीगमध्ये गुयाना अॅमेझॉन वॉरिअर्स आणि अँटेग्वा अॅण्ड बर्म्युडा फॅल्कॉन संघांदरम्यानच्या सामन्यात आझम खान फलंदाजी करत असताना हा प्रकार घडला. गुयाना अॅमेझॉन वॉरिअर्सच्या संघ धावांचा पाठलाग करताना आझम खान पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करायला आला. वेगवान गोलंदाज शामार स्पींजरच्या गोलंदाजीवर फलंदाजी करताना उसळी घेणारा चेंडू आझम खानला कळला नाही. वेस्ट इंडिजच्या या वेगवान गोलंदाजाने टाकलेला चेंडू अनपेक्षितरित्या उसळला आणि आझम खानच्या हेल्मेटखाली गळ्याजवळ लागला.
चेंडू एवढ्या वेगाने येईल अशी अपेक्षा आझम खानला नव्हती हे त्याच्या प्रतिसादावरुन स्पष्ट होत आहे. हा चेंडू हेल्मेटखाली आदळल्यानंतर आझम खान क्रिजमध्येच कोसळला. मात्र क्रिझमध्ये परत जाण्याच्या नादात तो स्टम्पकडे जाणारा चेंडू अडवायला गेला आणि त्याची बॅट स्टम्पला लागली. आपल्याबरोबर काय होत आहे हे आझम खानला समजत नव्हतं असं व्हिडीओ पाहिल्यावर वाटतं. आझम खानने बाद झाल्याचं समजल्यानंतर आधी डोक्यावरील हेल्मेट काढून गळ्याला हात लावला. यावेळेस आझम खानच्या चेहऱ्यावरील चिंता व्हिडीओत स्पष्टपणे दिसून येत आहे.
एवढ्या जोराच बॉल लागल्यानंतर तातडीने मैदानावरील अँटेग्वा अॅण्ड बर्म्युडा फॅल्कॉन संघांचे खेळाडू आझम खानच्या मदतीला धावले. तर मैदानाबाहेरुन फिजीओंनी मैदानात धाव घेत आझम खानला मदत केली. आझम खान खाली पडताच फॅल्कॉनच्या खेळाडूंनी इशारा करुन फिजीओंना बोलावल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनी क्रिकेटच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडल्याचं म्हटलं आहे. तुम्हीच पाहा हा सारा घटनाक्रम
— Cricket Cricket (@cricket543210) August 31, 2024
आझम खान बाद झाल्याने गुयाना अॅमेझॉन वॉरिअर्सचा संघ 77 धावांवर चार बाद अशा स्थितीत पोहचला. मात्र तळाकडील ओव्हर्समध्ये रोमारिओ शेफर्ड आणि ड्वेन पॅट्रीस यांनी केलेल्या तुफान फलंदाजीमुळे वॉरिअर्सने हा सामना अगदी शेवटच्या चेंडूवर जिंकला. त्यांनी 169 धावांचा यशस्वी पाठलाग केला.