मुंबई : पाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार बाबर आझमच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीत. टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी दुसरा गोलंदाजही जखमी झाला आहे. त्याची दुखापत इतकी आहे की, त्याला दवाखान्यात नेण्याची वेळ आलीये.
डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीनंतर आता दुसरा वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम ज्युनियरलाही दुखापत झालीये. शाहीन आधीच आशिया कपमधून बाहेर आहे. अशात वसीमचा टीममध्ये समावेश करण्यात आला. मात्र सराव करताना त्याला दुखापत झाली.
रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद वसीम ज्युनियरला आयसीसी अकादमीमध्ये नेट प्रॅक्टिस दरम्यान पाठीत दुखू लागलं. यानंतर व्यवस्थापनाने त्याच्या दुखापतीचं गांभीर्य ओळखत वसीमला तातडीने एमआरआयसाठी रुग्णालयात पाठवलं.
त्याच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वसीमला खेळणं कठीण असल्याचं मानलं जातंय. अशा स्थितीत बाबरसाठी मोठी अडचण होणार आहे.
रिपोर्ट्समध्ये असं म्हटलंय की, जर वसीम जखमी झाला असेल आणि प्रकरण थोडं गंभीर असेल तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. कारण टी-20 वर्ल्डकप पुढे खेळायचा आहे. अशा स्थितीत वसीमला आशिया कपमधून बाहेर जावं लागण्याची शक्यता आहे. पाकिस्तान टीमसाठीही हा मोठा धक्का असेल.
वसीम ज्युनियरने या महिन्यात नेदरलँड्सविरुद्ध वनडेमध्ये शेवटचा सामना खेळला, ज्यामध्ये त्याने 36 रन्स देत 4 विकेट्स घेतले. जूनमध्येच वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातही त्याने तीन विकेट्स घेतले होते. वसीमने आतापर्यंत एकूण 11 टी-20 सामने खेळले असून त्यात त्याने 17 विकेट घेतल्या आहेत. आशिया चषक स्पर्धेत भारताविरुद्ध पाकिस्तानच्या प्लेइंग-11 मध्ये त्याला स्थान मिळणं जवळपास निश्चित होतं.