मुंबई : आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात झोकात करावी, असं प्रत्येक खेळाडूला वाटतं. आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील पदार्पणातील सामन्यातील कामगिरीची सर्वांनी दखल घ्यावी, अशी कामगिरी करण्याचा मानस असतो. पण डेब्युत प्रत्येकाला अशी उल्लेखनीय कामगिरी करता येतेच असं नाही. पण सर्वच अपयशीच होतातच असंही नाही. एका बॅट्समनने पदार्पणातच शतक ठोकत धमाकेदार सुरुवात केली. या बॅट्समनने आपल्या या खेळीची दखल उभ्या क्रिकेट विश्वाला घ्यायला लावली. (on this day 31 july 1973 England Cricketer Frank Hayes scored hundred in debut match against west indies)
कोण आहे तो खेळाडू?
आपण बोलतोय ते इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू (England Cricket Team) फ्रँक हेज यांच्याबद्दल (Frank Hayes). फ्रँक यांनी आजच्याच दिवशी म्हणजेच 31 जुलै 1973 मध्ये हा कारनामा केला होता. त्यांनी दुसऱ्या डावात बॅटिंग करताना 106 धावांची नाबाद खेळी साकारली होती. फ्रँक यांनी ही कामगिरी वेस्टइंडिज विरुद्ध द ओव्हलवर केली होती.
सामन्याचा लेखाजोखा
या सामन्यात विंडिजने प्रथम बॅटिंग करताना 415 धावा केल्या. त्यानंतर प्रत्युतरादाखल इंग्लंडने 257 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये विंडिजने 255 धावा केल्या. यामुळे इंग्लंडला विजयासाठी 414 धावांचे तगडे आव्हान मिळाले. मात्र इंग्लंडला केवळ 255 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे इंग्लंडचा 158 धावांनी पराभव झाला.
एकाच ओव्हरमध्ये 34 धावा
विशेष म्हणजे फ्रँक यांनी 1977 मध्ये एका सामन्यात एकाच ओव्हरमध्ये त्यांनी 34 धावा कुटल्या. फ्रँक यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंत त्यांनी शिक्षकी पेक्षा स्वीकारला. ते ओकहम शाळेत विद्यार्थ्यांना गणित आणि फिजिक्सचे धडे देऊ लागले. फ्रँक यांनी इंग्लंडकडून एकूण 9 कसोटींमध्ये प्रतिनिधित्व केलं. यामध्ये त्यांनी 15.25 च्या सरासरीने 244 धावा केल्या. दुर्देव म्हणजे, पदार्पणात शतक ठोकल्यानंतर त्यांना 29 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत.
फ्रँक यांनी 6 वनडे सामन्यांमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं. यात त्यांनी 25.60 च्या एव्हरेजने 128 धावा केल्या.यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्यांची 52 ही सर्वोच्च धावसंख्या होती.
तसेच त्यांनी एकूण 272 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 35.86 च्या सरासरीने 13 हजार 10 धावा केल्या. यामध्ये त्यांनी 23 शतकं झळकावली. तर लिस्ट ए सामन्यात 1 शतकासह 25.97 च्या सरासरीने 4 हजार 857 धावा चोपल्या.