मुंबई : श्रीलंकेचे क्रिकेटर्स डिकवेला (Niroshan Dickwella) आणि कुशल मेंडिस (Kusal Mendis) यांनी इंग्लंड दौऱ्यावर असताना लज्जास्पद वर्तन केलं. या खेळाडूंनी इंग्लंच्या दौऱ्यावर बायो-बबलच्या नियमांचं उल्लंघन केलं असल्याची माहिती आहे. ज्यानंतर या खेळाडूंवर 1 वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.
श्रीलंका क्रिकेटने ब्रिटेन दौऱ्यात जैव-सुरक्षित वातावरणाचं उल्लंघन केल्याबद्दल फलंदाज धनुष्का गुणातिलका, कुशल मेंडिस आणि विकेटकीपर निरोशन डिकवेला यां तिघांवर 1 वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
याचप्रमाणे या खेळांडूंना दंडही भरावा लागणार आहे. या तिन्ही खेळाडूंना 25 हजार डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. या तिघांनीही जूनमध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी, डरहममध्ये कोविड सुरक्षेसाठी तयार केलेल्या बायो बबलच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं.
दरम्यान यांचा सोशल मीडियावर एक व्हीडियो व्हायरल झाला होता. या व्हिडीयोमध्ये कुशल मेंडिसच्या हातात काही मादक द्रव्यं दिसून येत होती. ज्याला निरोशन डिकवेला आणि कुशल गुपचूप पिण्याचा प्रयत्न करताना दिसले. हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांचा रोष सोशल मीडियावर पसरला.
या घटनेनंतर तिघांनाही तात्काळ निलंबित करून घरी पाठवण्यात आलंय. न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय शिस्तपालन समितीने तिघांनाही दोषी ठरवलं.