"मला खूप वाईट वाटतंय, यापेक्षा....", भारतीय कुस्तीपटूंना पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवर नीरज चोप्रा संतापला

Neeraj Chopra on Wrestlers Protest: दिल्लीत जंतर मंतरवर (Jantar Mantar) बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना आज पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. कुस्तीपटू नव्या संसद भवनाच्या दिशेने शांततापूर्ण मोर्चा काढत असताना पोलिसांनी त्यांना अडवलं. यानंतर त्यांनी कुस्तापटूंना अक्षरश: फरफटत नेलं.   

शिवराज यादव | Updated: May 28, 2023, 07:55 PM IST
"मला खूप वाईट वाटतंय, यापेक्षा....", भारतीय कुस्तीपटूंना पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवर नीरज चोप्रा संतापला title=

Neeraj Chopra on Wrestlers Protest: दिल्लीमधील कुस्तीपटूंचं (Wrestlers) आंदोलन पुन्हा एकदा पेटलं आहे. याचं कारण दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना रोखताना अक्षरश: फरफटत नेलं. यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात असून दिल्ली पोलिसांवर (Delhi Police) टीका केली जात आहे. जंतर मंतरवर (Jantar Mantar) बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू आज 'महापंचायत'मध्ये सहभागी होण्यासाठी नव्या संसद भवनाच्या दिशेने शांततापूर्ण मोर्चा काढत असताना पोलिसांनी त्यांना अडवलं. यानंतर त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे देशात संतापाची लाट पसरली आहे. या कारवाईचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक दिग्गज कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्याबद्दल ताब्यात घेतलं आहे. हे सर्वजण नवीन संसदेच्या इमारतीकडे जात असताना पोलिसांनी त्यांना घेरलं. यानंतर झालेल्या झटापटीत पोलीस अक्षरश: कुस्तीपटूंना फरफटत होते. यानंतर विरोधी पक्षाच्या राजकीय नेत्यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर टीकास्त्र सोडलं आहे. 

आंदोलनात सहभागी साक्षी मलिकनेही पोलिसांच्या कारवाईचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यात तिने लिहिलं आहे की, 'चॅम्पियन्सना अशी वागणूक दिली जात आहे. सर्व जग हे पाहत आहे'. दरम्यान तिच्या या ट्वीटवर ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा व्यक्त झाला असून नाराजी जाहीर केली आहे. 

नीरज चोप्राने पोलिसांनी खेळाडूंना ज्याप्रकारे हाताळलं आहे त्यावर नापसंती व्यक्त करत अजून चांगल्या प्रकारे ही गोष्ट हाताळता आली असती असं म्हटलं आहे. "हे पाहून मला वाईट वाटत आहे. ही गोष्ट हाताळण्यासाठी अजून चांगला पर्याय असता," असं नीरज चोप्राने म्हटलं आहे. 

कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनाच्या जागेवर कूच करून ‘महिला महापंचायत’ आयोजित करण्याची योजना आखली होती. पण याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन आयोजित करण्यात आलं. कुस्तीपटूंना आधी जंतर मंतर सोडण्याची परवानगी देण्यात आली होती. पण आंदोलन ठिकाणी असणारे बॅरिकेड्स ओलांडताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. २४ एप्रिलपासून कुस्तीपटू येथे  भारतीय कुस्ती संघाचे (WFI) प्रमुख बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत. बृजभूषण सिंग यांच्यावर त्यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी करत आहेत. 

कुस्तीपटूंविरोधात झालेल्या कारवाईविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी ट्वीट करत निषेध नोंदवला आहे. राज्याभिषेक संपला असून, गर्विष्ठ राजा आता रस्त्यावरील लोकांचे आवाज दाबत आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, प्रियंका गांधी, जयराम रमेश यांनीही ट्वीट करत भाजपावर टीका केली आहे. तसंच तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्षानेही याचा विरोध केला आहे.