मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी डावखुरा फलंदाज विनोद कांबळीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगलं नाव कमवलं. काही सामन्यांत त्याने आपल्या फलंदाजीने क्रिकेट विश्वात अनेक रेकॉर्ड बनवले. 18 जानेवारी 1972 रोजी जन्मलेला विनोद हा 49 वर्षांचा झाला आहे. सचिन तेंडुलकरचा तो मित्र आहे. सुरुवातीपासून दोघांनी क्रिकेटची एकत्र सुरुवात केली होती.
इंदिरा नगर, कांजूरमार्ग, मुंबई येथे जन्मलेल्या विनोदने आपल्या कारकीर्दीच्या सुरूवातीलाच उत्तम कामगिरी केली. 1996 चा विश्वचषक हा त्यांच्यासाठी दुर्दैवी ठरला आणि या स्पर्धेनंतर त्यांची कारकीर्द हळू हळू संपली. सचिन तेंडुलकरबरोबर विक्रम शेअर करत तो चर्चेत आला. हॅरिस शिल्ड ट्रॉफीमध्ये विनोदने शार्दाश्रम स्कूलसाठी सचिनबरोबर 664 भागीदारी केली होती. यापैकी 349 विनोद तर सचिनने 326 धावा केल्या. ही भागीदारी झाली तेव्हा सचिन 15 तर विनोद साधारण 16 वर्षाचा होता. विनोदने 1991 साली पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 1993 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना तो खेळला.
कसोटीत सर्वात जलद 1000 धावा
भारताकडून कसोटी क्रिकेटसाठी सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रम अद्याप विनोदच्या नावावर आहे. 1994 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने हा विक्रम केला होता. 14 डावांमध्ये 1000 कसोटी धावा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विनोद कांबळेची कारकीर्द 14 कसोटी सामने आणि 104 एकदिवसीय सामने अशी ठरली. त्याने एकदिवसीय सामन्यात 2427 धावा केल्या तर कसोटीत सर्वाधिक 227 धावाचा रेकॉर्ड आहे. त्याने कसोटीत 1084 धावा केल्या आहेत. विनोद कांबळेने 4 कसोटी आणि 2 एकदिवसीय सामन्यात शतकीय खेळी केली आहे.