भारत न्यूझीलंड पहिली वनडे, अशी आहे नेपिअरमधली भारताची कामगिरी

वनडे सीरिजचा पहिला सामना हा २३ जानेवारीला नेपिअर येथे खेळला जाणार आहे.

Updated: Jan 20, 2019, 10:03 PM IST
भारत न्यूझीलंड पहिली वनडे, अशी आहे नेपिअरमधली भारताची कामगिरी title=

नेपिअर : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात टेस्ट आणि वनडे सीरिजमध्ये पराभूत केल्यानंतर भारतीय टीम आता ५ वनडे आणि ३ टी-२० मॅचच्या सीरिजसाठी न्यूझीलंडला रवाना झाला आहे. भारताचा हा नियोजित दौरा २३ जानेवारी ते १० फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. आधी ५ वनडे आणि मग 3 टी-२० सामने खेळले जाणार आहेत. यजमान न्यूझीलंडने देखील श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वनडे सीरिजमध्ये ३-० असा विजय मिळवला आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीमच्या विश्वासात वाढ झाली असेल. या विजयामुळे दोन्ही टीम फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे ही सीरिज कोण जिंकणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे. 

भारताची नेपिअरवरील कामगिरी

वनडे सीरिजचा पहिला सामना हा २३ जानेवारीला नेपिअर येथे खेळला जाणार आहे. भारताने आतापर्यंत नेपिअर मैदानात न्यूझीलंड विरुद्ध ६ वनडे खेळल्या आहेत. या ६ मॅचपैकी भारताला फक्त २ तर न्यूझीलंडला ४ सामने जिंकता आले आहेत. तर न्यूझीलंडने आतापर्यंत या मैदानात एकूण ४० सामने खेळले आहेत. यापैकी २४ सामन्यात न्यूझीलंडचा विजय झाला आहे. तर १३ सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. २ सामने बरोबरीत सुटले तर १ सामना हा अनिर्णित राहिला. 

भारताने या मैदानात अखेरचा सामना १९ जून २०१४ साली खेळला होता. या सामन्यात प्रथम बॅटिंग करताना न्यूझीलंडच्या टीमनं ७ विकेट गमावत २९२ रन केल्या होत्या. २९३ रनचा पाठलाग करताना भारताला केवळ २६८ रनच करता आल्या. य़ामुळे भारताचा २४ रननी पराभव झाला होता. त्यावेळेस भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी होता.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने नेपीअरच्या मैदानात देखील शतकी कामगिरी केली आहे. विराटने २०१४ साली १११ बॉलमध्ये ११ फोर आणि २ सिक्सच्या मदतीने १२३ रनची खेळी केली होती.

मोहम्मद शमीने नेपीअरच्या मैदानात 4 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. 2014 ला ९ ओव्हरमध्ये ५५ रन देत त्याने ४ खेळाडूंना तंबूत पाठवले होते. या कामगिरी मुळे येत्या २३ तारखेच्या सामन्यात देखील मोह्म्मद शमीकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.  

भारताची बॉलिंग हा गंभीर प्रश्न होता. पण तो आता काही प्रमाणात नाहीसा झाला आहे, असे म्हणण्यास वाव आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धात दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भुवनेश्वर कुमारने ४ विकेट घेतल्या होत्या तर तिसऱ्या सामन्यात फिरकीपटू युजवेंद्र चहालने ६ विकेट घेतल्या होत्या.