क्राईस्टचर्च : श्रीलंकेविरुद्धची २ टेस्ट मॅचची सीरिज न्यूझीलंडनं १-०नं जिंकली आहे. न्यूझीलंडनं दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये श्रीलंकेचा तब्बल ४२३ रननी पराभव केला. दुसऱ्या टेस्टच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडनं १४ बॉलमध्ये श्रीलंकेच्या ३ विकेट घेऊन विजय मिळवला. वेलिंग्टनमध्ये झालेली पहिली टेस्ट ड्रॉ झाली होती. न्यूझीलंडनं त्यांच्या क्रिकेट इतिहासात ८८ वर्षात पहिल्यांदाच लागोपाठ ४ टेस्ट सीरिज जिंकल्या आहेत. याआधी न्यूझीलंडनं वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि पाकिस्तानला पराभूत केलं होतं.
क्राईस्टचर्चमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये न्यूझीलंडनं श्रीलंकेला विजयासाठी ६६० रनचं आव्हान दिलं. पण श्रीलंकेची टीम २३६ रनवर ऑल आऊट झाली. न्यूझीलंडच्या टीम साऊथीला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. साऊथीनं ६८ रन केले आणि ५ विकेटही घेतल्या.
मॅचच्या पाचव्या दिवशी श्रीलंकेची टीम मैदानात उतरली तेव्हा त्यांचा स्कोअर २३१/६ असा होता. ४ विकेट बाकी असल्यामुळे श्रीलंकेची टीम एक-दोन तास तरी संघर्ष करेल, असं वाटत होतं. पण न्यूझीलंडच्या बॉलरनी ३ विकेट फक्त १२ मिनीटं आणि १४ बॉलमध्ये घेतल्या. एंजलो मॅथ्यूज दुखापतीमुळे बॅटिंग करायला आला नाही.
४२३ रननी विजय हा न्यूझीलंडचा टेस्ट क्रिकेटमधला सगळ्यात मोठा विजय होता. तर श्रीलंकेचा सगळ्यात मोठा पराभव होता. २ वर्षांआधी न्यूझीलंडनं झिम्बाब्वेचा २५६ रननी पराभव केला होता. हा त्यांचा सगळ्यात मोठा विजय होता. तर श्रीलंकेचा २०१७ साली भारताविरुद्ध ३०४ रननी पराभव झाला होता. हा याआधीचा श्रीलंकेचा सगळ्यात मोठा पराभव होता.