हॅमिल्टन : भारताविरुद्धच्या ३ टी-२० मॅचच्या सीरिजसाठी न्यूझीलंडनं त्यांच्या टीमची घोषणा केली आहे. ६ फेब्रुवारीपासून टी-२० सीरिजला सुरुवात होणार आहे. न्यूझीलंडनं त्यांच्या टीममध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. ऑल राऊंडर डॅरिल मिचेल आणि फास्ट बॉलर ब्लेयर टिकनेर यांचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एक टी-२० मॅचमधून बाहेर झालेला केन विलियमसन कर्णधार म्हणून कायम आहे. न्यूझीलंडच्या टीममध्ये १४ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. स्थानिक टी-२० स्पर्धा असलेल्या सुपर स्मॅशमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे डॅरिल मिचेल आणि ब्लेयर टिकनेर यांची टीममध्ये निवड झाली आहे.
या टी-२० सीरिजसाठी भारतीय टीमचं नेतृत्व विराट कोहलीऐवजी रोहित शर्माकडे देण्यात आलं आहे. तिसऱ्या वनडेनंतर विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. विराटऐवजी दुसऱ्या कोणत्याच खेळाडूची टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही.
भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये न्यूझीलंड टीम खराब फॉर्ममध्ये आहे. ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये न्यूझीलंड ३-०नं पिछाडीवर आहे. पहिल्या तिन्ही मॅच गमावल्यामुळे सीरिजही न्यूझीलंडच्या हातून गेली आहे. तर मागच्या वर्षभरात त्यांचा टी-२० फॉर्मही फारसा चांगला नव्हता. मागच्या वर्षात न्यूझीलंडला १५ पैकी फक्त ८ टी-२० मॅच जिंकता आल्या.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिली टी-२० हॅमिल्टन, दुसरी टी-२० ऑकलंड आणि तिसरी टी-२० मॅच हॅमिल्टनमध्ये खेळवली जाईल. तीन मॅचच्या सीरिज दरम्यान दोन्ही देशाच्या महिला टीमच्या मॅचही त्याच खेळपट्टीवर खेळवल्या जाणार आहेत.
केन विलियमसन (कर्णधार), डग ब्रेसवेल, कॉलिन डि ग्रॅण्डहोम, लॉकी फरग्युसन, मार्टीन गप्टील, स्कॉट के, डॅरिल मिचेल, कॉलीन मुन्रो, मिचेल सॅण्टनर, टीम सेयफर्ट, ईश सोदी, टीम साऊदी, रॉस टेलर, ब्लेयर टिकनेर
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पांड्या