IND vs PAK Asia Cup 2022 : भारत पाक हाय व्होल्टेज सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. अगदी शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यामध्ये भारताने रोमहर्षक विजय मिळवला आहे. भारतीय संघाचं कौतुक केलं जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय संघाचं कौतुक केलं आहे.
आजच्या सामन्यात टीम इंडियाने अष्टपैलू कामगिरी केली. संघाने उत्तम कौशल्य आणि संयम दाखवला आहे. विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.
पाकिस्तानच्या 148 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. भारताचे त्रिमुर्ती आजही काही खास चमक दाखवू शकली नाही. मात्र रविंद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या यांनी संयमी खेळी करत विजयाचा पाया रचला. भारत विजयाच्या उंबरठ्यावर असताना जडेजा बाद झाला. मात्र हार्दिकने राहिलेलं काम पूर्ण करत भारताचा विजय साकार केला.
#TeamIndia put up a spectacular all-round performance in today’s #AsiaCup2022 match. The team has displayed superb skill and grit. Congratulations to them on the victory.
— Narendra Modi (@narendramodi) August 28, 2022
पाकिस्तानची पहिली फलंदाजी
कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. फंलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तान संघाची सुरूवात खराब झाली. कर्णधार बाबर आझमला 10 धावांवर भुवनेश्वर कुमारने बाद केलं. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या फखर जमानने चौकार मारत सुरूवात केली होती मात्र त्यालाही युवा गोलंदाज आवेश खानने 10 धावांवर झेलबाद केलं. इफ्तिखार अहम आणि खुशदिल शाह आणि एक बाजू लावून धरलेल्या मोहम्मद रिझवान यांना अष्टपैलू हार्दिक पांड्याने बाद केलं.
पाकिस्तान दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात खराब झाली, पहिल्यात षटकामध्ये के. एल. राहुल शून्यावर बाद झाला. पाकिस्तानचा पदार्पणवीर नसीमने राहुलला क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी डाव सवारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची भागीदार फार वेळ टिकली नाही. रोहित 12 तर विराट 35 धावांवर बाद झाले. चौथ्या क्रमांकावर आलेला सूर्यकुमार यादवही नसीमच्या जाळ्यात फसला, नसीमने सूर्याची 18 धावांवर असतावा दांडी गुल केली. विजयाच्या उंबरठ्यावर असताना जडेजा 35 धावांवर बाद झाला. पांड्याने सिक्स मारत विजयावर शिक्कामोर्तब केलं.