IND vs PAK Asia Cup 2022 अखेर बदला घेतलाच, चुरशीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला चारली धूळ

एशिया कप स्पर्धेत भारताची विजयी सलामी

Updated: Aug 28, 2022, 11:56 PM IST
IND vs PAK Asia Cup 2022 अखेर बदला घेतलाच, चुरशीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला चारली धूळ  title=

IND vs PAK Asia Cup 2022 :  अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या हाय व्होल्टेज सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव करत विजयाचा श्रीगणेशा केला आहे. या विजयासोबत भारताने गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकामधील पराभवाचा बदलाही घेतला आहे. पाकिस्तानने विजयासाठी भारतासमोर 148 धावांचं आव्हान ठेवलं होतं. रविंद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्याच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने हे 5 विकेट्स राखत हे आव्हान पार केलं. 

पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात खराब झाली, पहिल्यात षटकामध्ये के. एल. राहुल शून्यावर बाद झाला. पाकिस्तानचा पदार्पणवीर नसीमने राहुलला क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची भागीदारी फार वेळ टिकली नाही. रोहित 12 तर विराट 35 धावांवर बाद झाले. चौथ्या क्रमांकावर आलेला सूर्यकुमार यादवही नसीमच्या जाळ्यात फसला, नसीमने सूर्याची 18 धावांवर असतावा दांडी गुल केली. विजयाच्या उंबरठ्यावर असताना जडेजा 35 धावांवर बाद झाला. पांड्याने सिक्स मारत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

पाकिस्तानची पहिली फलंदाजी 
कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तान संघाची सुरूवात खराब झाली. कर्णधार बाबर आझमला 10 धावांवर भुवनेश्वर कुमारने बाद केलं. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या फखर जमानने चौकार मारत सुरूवात केली होती मात्र त्यालाही युवा गोलंदाज आवेश खानने 10 धावांवर झेलबाद केलं. इफ्तिखार अहम आणि खुशदिल शाह आणि एक बाजू लावून धरलेल्या मोहम्मद रिझवान यांना अष्टपैलू हार्दिक पांड्याने बाद केलं. 

शाहनवाज दहनी आणि हरिस रौफ यांनी शेवटला येत छोटेखानी खेळी करत पाकिस्तानला 147 धावांचा पल्ला गाठून दिला. भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला जास्त वेळ तग धरता आला नाही. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 4 विकेट तर हार्दिक पांड्याने 3 विकेट घेतल्या.