मुंबई : 17 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) महेंद्रसिंग धोणीची (MS Dhoni) टीम इंडियाचा (Team India) मेंटॉर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. धोणीचा अनुभव टीम इंडियासाठी फायदेशीर ठरणार आहे. या जबाबदारीसाठी धोणीला बीसीसीआय किती रक्कम देणार याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी चाहत्यांच्या या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
जय शाह यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. एम एस धोणी टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून कोणतंही मानधन घेणार नसल्याचं जय शाह यांनी म्हटलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वचषक स्पर्धेत धोणीने टी20 विश्वचषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघ निवडीतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. धोणीला टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून नियुक्त करण्यात जय शाह यांचा महत्त्वाच वाटा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
"MS Dhoni is not charging any honorarium for his services as the mentor of Indian team for the T20 World Cup," BCCI Secretary Jay Shah to ANI
(file photo) pic.twitter.com/DQD5KaYo7v
— ANI (@ANI) October 12, 2021
धोणीच्या नियुक्तीमुळे भारतीय संघाला मोठा फायदा होणार आहे. धोणी भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार आहे. धोणीच्या नेतृत्वात भारताने टी20 विश्वचषक, 2010 आणि 2016 आशिया कप, 2011 विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन चषक जिंकला आहे. याशिवाय भारतीय संघातही धोणीचा आदर करणार अनेक खेळाडू आहेत.