मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फास्ट बॉलर मिचेल स्टार्क याने आयपीएलमधल्या एका प्रकरणाबाबत खटला दाखल केला आहे. मागच्या वर्षी दुखापत झाल्यामुळे स्टार्क आयपीएलमध्ये कोलकात्याकडून एकही मॅच खेळला नव्हता. यामुळे विम्याचे १५.३ लाख डॉलर (जवळपास १०.६० कोटी रुपये) मिळावे म्हणून स्टार्कने विमा कंपनीविरुद्ध खटला दाखल केला आहे.
ऑस्ट्रेलियातलं वृत्तपत्र सिडनी मॉर्निंग हेराल्डने याबद्दलचं वृत्त छापलं आहे. स्टार्कने व्हिक्टोरियन काऊंटी कोर्टात त्याच्या विमा सेवा देणाऱ्या कंपनीविरुद्ध खटला दाखल केला आहे. मिचेल स्टार्क मागच्यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचवेळी दुखापतग्रस्त झाला होता.
मिचेल स्टार्कने लंडनच्या लॉयड सिंडिकेटविरुद्ध खटला दाखल केला आहे. लॉयड सिंडिकेट ही विमा सेवा देणारी कंपनी आहे. एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर त्याला मॅच न खेळल्यामुळे झालेलं आर्थिक नुकसान भरून देण्याचं काम ही विमा कंपनी करते. मिचेल स्टार्कने दाखल केलेल्या याचिकेनुसार त्याची संपूर्ण मेडिकल टेस्ट झाली होती.
शाहरुख खानची मालकी असलेल्या कोलकात्याच्या टीमने मिचेल स्टार्कला जवळपास १८ लाख डॉलरची बोली लावून विकत घेतलं होतं. वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार यानंतर स्टार्कने विमा घेतला. या विम्यामध्ये दुखापतीमुळे आयपीएल खेळली नाही तर १५.३ लाख डॉलर मिळण्याचं प्रावधान होतं. स्टार्कने या विम्यासाठी ९७,९२० डॉलर (जवळपास ६७.८६ लाख रुपये) दिले होते.
२९ वर्षांचा मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियाचा प्रमुख खेळाडू आहे. स्टार्कने ७५ वनडे, ५१ टेस्ट आणि २१ टी-२० आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत. आयपीएलमध्ये २०१४-१६ दरम्यान स्टार्क बंगळुरूकडून खेळला होता. यानंतर कोलकात्याने त्याच्याबरोबर करार केला, पण दुखापतीमुळे तो कोलकात्याकडून खेळू शकला नाही.