मुंबई : 23 जुलैपासून सुरु होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics 2021) उद्घाटन सोहळ्यात भारताची आघाडीची महिला बॉक्सिंपटू मेरी कोम (MC Marykom) आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग (Manpreet Singh) यांना भारतीय पथकाचं ध्वजवाहक बनण्याचा मान मिळाला आहे. तर जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Puniya) 8 ऑगस्टला होणाऱ्या सांगता सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक असेल. भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं (IOA) याबाबत माहिती दिली आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा मागच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये खेळवली जाणार होती. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता 23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान जपानमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे.
Boxer MC Mary Kom & hockey player Manpreet Singh to be flag bearers of Indian contingent at Tokyo Olympics opening ceremony; wrestler Bajrang Punia to be flag bearer of the contingent at the closing ceremony
(file photos) pic.twitter.com/dciT4EBS0U
— ANI (@ANI) July 5, 2021
ऑलिम्पिकसाठी पहिल्यांदाच भारताकडून पुरुष आणि महिला असे दोन ध्वजवाहक असणार आहेत. ‘याआधी भारताचा एकच ध्वजवाहक असायचा, पण लैंगिक समानतेला योग्य न्याय देत, आता दोन ध्वजवाहक निवडण्यात आलेत अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (IOA) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी दिली आहे. याआधीच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा नेमबाज अभिनव बिंद्राला ध्वजवाहकाचा मान मिळाला होता. 2008 मध्ये बिंद्राने सुवर्ण पदक पटकावलं होतं. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावणारा अभिनव बिंद्रा हा एकमेव भारतीय खेळाडू आहे.
बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोम ही भारतासाठी ऑलम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू आहे. 2012 साली मेरीने ऑलम्पिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होतं. आयओएने केलेल्या घोषणेनंतर मेरि कोमने म्हटलं आहे की 'खेळाडू म्हणून ही माझी शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा आहे, उद्घाटन सोहळ्यात संघाचं प्रतिनिधित्व करायला मिळणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. यासाठी मी क्रीडा मंत्रालय आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेची आभारी आहे. मी पदक मिळवण्यासाठी सर्वश्रेष्ठ योगदान देईन, असं मेरी कोमनं म्हटलं आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये मेरी पात्र ठरली नव्हती. मात्र 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदक जिंकलं. 2014च्या आशियाई खेळांमध्ये तिने सुवर्ण, तर 2020मध्ये रौप्यपदक जिंकले होतं.
28 वर्षीय मनप्रीत सिंग तिसर्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहे. 2016 पासून तो भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार आहे. 2014च्या इंचेऑन आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन रौप्यपदक जिंकणार्या तो भारतीय संघाचा सदस्य होता.
भारतीय पथकात 126 खेळाडू आणि 25 प्रशिक्षक तसंच अन्य अधिकारी अशा एकूण 201 जणांचा समावेश असणार आहे. तसेच भारतीय पथकातील 126 खेळाडूंपैकी 56 टक्के खेळाडू हे पुरुष असून 44 टक्के महिला खेळाडू आहेत, अशी माहिती आयओएकडून देण्यात आली.