नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या आणि अतिशय कमी वेळात आपल्या कारकिर्दीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या विराट कोहलीची कामगिरी दिवसेंदिवस अधिकच प्रभावी ठरत आहे. क्रिकेटच्या मैदानातील वावर पाहता अनेकदा त्याची तुलना काही खेळाडूंशी केली जाते. यातच आता आणखी एका माजी खेळाडूचं नाव जोडण्याच आलं आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या आणि त्याच देशाच्या क्रिकेट संघाकतून अनेक वर्षे जागतिक क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवणाऱ्या इम्रान खान यांच्याशी विराटचं नाव जोडलं जात आहे. त्यांच्यात आणि विराटमध्ये बरंच साम्य असल्याचं वक्तव्य पाकिस्तानचे माजी फिरकी गोलंदाज अब्दुल कादीर यांनी केलं आहे.
'एक कर्णधार आणि एक फलंदाज म्हणून विराटकडे पाहिलं असता त्याच्यामध्ये आणि इम्रान खान यांच्यामध्ये मला बऱ्याच गोष्टी एकसारख्या आढळून येतात. तो स्वत:कडून काही अपेरक्षा ठेवण्यासोबतच संघाकडूनही तशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा करतो', असं कादीर एका टेलिव्हिजन मुलाखतीत म्हणाले.
खान आणि विराट यांच्यात आपण तुलना करत नसून, विराटच्या नेतृत्तवक्षमतेलाच आपण अधोरेखित करत असल्याची बाब त्यांनी यावेळी स्पष्ट केली. 'खान यांच्याप्रमाणेच कोहलीसुद्धा त्याच्यासोबतच्या खेळाडूंच्या चांगल्या प्रदर्शनाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यांवर घेतो, हा त्याचा गुण या मुलाखतीत कादीर यांनी सर्वांसमोर मांडला.
बराच काळ इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कादीर यांनी यावेळी कोहली आणि खान यांच्याती साम्य असणारे निकष मांडताना आणखी एक लक्षवेधी विधान केलं. 'इम्रान खान यांच्याविषयी विचारा तर, त्यांचं एकंदर व्यक्तीमत्वं आणि इतर खेळाडूंकडून सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करुन घेण्याची त्यांची क्षमता या गोष्टी पाहता विराट अजून तिथपर्यंत पोहोचला नाही. पण, तो विराटची कामगिरी ही तितकीच प्रभावी आणि आदर्श प्रस्थापित करणारी आहे यात वादच नाही', असं ते म्हणाले. .