बर्मिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताची बॅटिंग गडगडली आहे. दुसऱ्या दिवसाच्या चहापानापर्यंत भारताचा स्कोअर १६०/६ असा झाला आहे. विराट कोहली ५३ रनवर नाबाद आणि अश्विन ६ रनवर नाबाद खेळत आहे. इंग्लंडच्या सॅम कुरननं ४ तर बेन स्टोक्सनं २ विकेट घेतल्या आहेत. भारत अजूनही १२७ रननी पिछाडीवर आहे. लंचनंतर ७६/३ अशी सुरूवात करणाऱ्या भारतानं अजिंक्य रहाणे(१५), दिनेश कार्तिक(०) आणि हार्दिक पांड्या(२२) या तीन विकेट गमावल्या. पहिल्या सत्रामध्ये भारताला मुरली विजय(२०), शिखर धवन(२६) आणि लोकेश राहुल(४)च्या रुपामध्ये ३ धक्के बसले. मुरली विजय आणि शिखर धवननं ५० रनची ओपनिंग पार्टनरशीप केली होती.
त्याआधी दुसऱ्या दिवसाची सुरुवात २८५/९ अशी करणाऱ्या इंग्लंडला दुसऱ्या दिवशी फक्त २ रनच करता आल्या. मोहम्मद शमीनं इंग्लंडची शेवटची विकेट घेतली. भारताकडून अश्विनला सर्वाधिक ४ विकेट मिळाल्या. तर मोहम्मद शमीला ३ विकेट घेण्यात यश आलं. उमेश यादव आणि इशांत शर्माला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं सर्वाधिक ८० रन केल्या. रूटला विराट कोहलीनं रन आऊट केलं. तर जॉनी बेअरस्टोला ७० रनवर उमेश यादवनं बोल्ड केलं.