KL Rahul About Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकीपर फलंदाज के. एल. राहुल मागील काही महिन्यांपासून दमदार खेळी करत आहे. आधी जायबंदी झाल्याने आणि त्यापूर्वी कामगिरीत सातत्य नसल्याने 2023 मधील पहिल्या काही महिने के. एल. राहुलसाठी चांगले ठरले नाहीत. पायाला दुखापत झाल्याने वर्षाच्या सुरुवातीला अनेक महिने मैदानापासून दूर राहिल्यानंतर के. एल. राहुलने वर्ल्ड कप 2023 मध्ये दमदार पुनरागमन केलं. त्याने आपल्या खेळीने अनेकदा भारताला या स्पर्धेमध्ये संकटातून बाहेर काढलं. मात्र या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. वर्ल्ड कप स्पर्धेमधील सामन्यातील पराभवाचा संदर्भ देत संन्यास घेण्याबद्दल के. एल. राहुलने विधान केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
2023 च्या आधीच्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्येही विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये एका सामन्यातील सुमार कामगिरीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं होतं. भारतीय संघ वर्ल्ड कप 2019 च्या सेमीफायलनमध्ये न्यूझीलंडकडून पराभूत झाला होता. या पराभवासहीत भारतीय संघ अनपेक्षितरित्या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. या पराभवासंदर्भात बोलताना के. एल. राहुलने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या. "त्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये संघातील सर्व खेळाडू फार आत्मविश्वास असणारे होते. कोणत्याही खेळाडूला स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपण हा वर्ल्ड कप जिंकणार नाही. पहिल्या फेरीमध्ये आम्ही काही भन्नाट विजय नोंदवले होते. काही सामन्यांमध्ये वाईठ कामगिरी केली मात्र आम्ही विजयपथावर होतो," असं के. एल. राहुल म्हणाला.
"2019 च्या वर्ल्ड कप संघाला यावर विश्वास बसत नव्हता किंवा आम्ही त्याबद्दल विचारही केला नव्हता की आम्ही पराभूत होऊ शकतो. आम्ही प्रत्येक आव्हान यशस्वीपणे स्वीकारलं होतं. त्यामुळे आपण पराभूत होणार नाही असा आम्हाला एक टीम म्हणून विश्वास होता. आमचा संघ कोणत्याही प्रकारच्या पराभवासाठी तयार नव्हता. त्यामुळेच सेमीफायलनमध्ये झालेला पराभव आम्हाला जिव्हारी लागला. आम्ही सारेजण स्तब्ध होतो. धावांचा पाठलाग करताना रविंद्र जडेजा आणि महेंद्र सिंग धोनी फलंदाजी करत होते त्यावेळी काहीतरी चमत्कार होईल आणि आमचा संघ जिंकेल असं वाटत होतं," असंही के. एल. राहुलने 'स्टार स्पोर्ट्स'च्या 'बिलिव्ह' या नव्या सिरीजमधील मुलाखतीत सांगितलं.
भारत विरुद्ध न्यूझीलंडदरम्यानच्या या सेमीफायलनच्या सामन्याबद्दल बोलताना के. एल. राहुलने, "प्रत्येकाला चमत्कार होईल अशी अपेक्षा होती. मात्र तसं काही झालं नाही. पराभवानंतर ड्रेसिंग रुममधील प्रत्येक जण फारच भावूक झाला होता. तो दिवस मला आजही आठवतो कारण मी त्यापूर्वी कधीच सर्वांना रडताना किंवा निराश झालेलं पाहिलं नव्हतं," असंही सांगितलं. "त्या दिवसाची कोणतीही आठवण फारशी चांगली नाही. मात्र आमच्यासाठी तो फार मोठा धडा होता. तुम्ही वर्षभर कितीही चांगलं खेळा. मात्र 10 किंवा 15 वर्षांच्या करियरनंतर जेव्हा आम्ही निवृत्त होऊ तेव्हा आमच्या करियरमधील धावा किंवा विकेट्स किंवा द्विपक्षीय मालिकांमधील विजय आमच्या किंवा चाहत्यांच्या लक्षात राहणार नाहीत. वर्ल्ड कप स्पर्धा सर्वांच्या लक्षात राहील. त्यामुळेच आम्हाला पुढील वर्ल्ड कपमध्ये अधिक चांगली कामगिरी करायची होती," असंही राहुलने सांगितलं.