मुंबई : रोहित शर्मा आता भारताच्या तिन्ही फॉर्मेटमधील क्रिकेटचा कर्णधार बनला आहे. विराट कोहलीकडून कर्णधारपदं गेल्यानंतर सर्व सूत्र रोहितने हाती घेतली असून टीम इंडिया त्याच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करतेय. दरम्यान आता कोहली कर्णधारपदावरून हटल्यानंतर भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने मोठं विधान केलं आहे.
जसप्रीत बुमराहच्या म्हणण्याप्रमाणे, त्याची उपकर्णधार बनण्याची भूमिका ही पहिल्याप्रमाणेच आहे. बुमराह म्हणाला, "टीमचा सिनियर खेळाडू असल्यामुळे मला इतर खेळाडूंची मदत करावी लागेल. मी यापूर्वी देखील म्हटलं आहे की उपकर्णधार हे माझ्यासाठी केवळ एक पद आहे."
बुमराह पुढे म्हणाला की, "माझा नेहमी प्रयत्न असेल की मला रोहित शर्माची मदत करायची आहे. मी प्रत्येक परिस्थितीत माझं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन. मला नाही वाटत कोणतं पद किंवा परिस्थिती महत्त्वाची आहे किंवा एक गोलंदाज किंवा फलंदाजामध्ये अंतर निर्माण होईल. तुम्ही धोरणात्मकदृष्ट्या किती मजबूत आहात आणि परिस्थितीला कसे सामोरे जाता यावर संपूर्ण अवलंबून आहे."
टीम इंडियाचा स्टार ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन त्याच्या दुखापतीतून बरा होत असल्याचंही बुमराने सांगितलं. श्रीलंकेविरूद्धच्या टेस्ट सिरीजपूर्वी तो सराव करतोय, असंही तो म्हणाला. दुखापतीमुळे अश्विन वेस्टइंडिज आणि श्रीलंकेविरूद्धच्या सिरीजमध्ये खेळू शकला नाही.