मुंबई : चेंडूसोबत छेडछाड केल्याप्रकरणी स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर आयपीएलमध्ये देखील बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणासंबंधी बोलताना ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन इयान चॅपल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते असे म्हणाले की, या दोघांवर IPL मध्ये लावलेली बंदी ही स्वागतायोग्य आहे. यामुळे हे दोघेही भारतीयांच्या रागापासून देखील वाचू शकतात.
तसेच चॅपल म्हणाले की, IPL मध्ये बंदी केल्यामुळे या दोघांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागेल. मात्र भारतीय चाहत्यांच्या रागापासून ते काही काळ दूर राहतील. कारण चेंडूसोबत केलेली छेडछाड हा मुद्दा अगदी ताजा असताना त्यांना चाहत्यांच्या अधिक रोषाला सामोरे जावे लागेल. त्याचप्रमाणे या प्रकरणात हे सिद्ध झालं आहे की बीसीसीआय अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करत आहे. आणि हे खरंच स्वागतार्ह आहे.
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळताना केपटाऊन टेस्टमध्ये चेंडूसोबत छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाने स्टिव्ह स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी लावली आहे. त्यानंतर बीसीसीआयने या दोघांनाही आयपीएलमध्ये देण्यास मनाई केली आहे. तर या प्रकरणात सहभागी असलेला कॅमरन बॅनक्रॉफ्ट याच्यावर देखील सीएने 9 महिन्यांची बंदी लावली आहे.
चॅपल यांनी पुढे असे सांगितले की, गेल्या काही वर्षापासून बीसीसीआयचे शासन प्रभावशाली नाही. मात्र या घेतलेल्या निर्णयामुळे खेळाडूंच वागणं नक्की बदलेल. या प्रकरणात ऑस्ट्रेलिया आणि आयसीसी काही प्रमाणात नक्कीच दोषी आहेत. तसेच या प्रकरणावरून सीए आणि आयसीसीने हे लक्षात घेतलं पाहिजे की, विश्वभरात क्रिकेटच्याबाबतीतले व्यवहार हे या पातळीवर गेले आहेत. कारण ते मैदानात खेळाडूंवर लगाम लगावण्यात कमी पडले आहेत. आणि यामुळेच अशा घटना घडत आहेत.