पुढचे २ आठवडे पत्नी दीपिकासाठी महत्त्वाचे- दिनेश कार्तिक

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी केकेआरनं त्यांची जर्सी लॉन्च केली आहे.

Updated: Apr 1, 2018, 10:10 PM IST
पुढचे २ आठवडे पत्नी दीपिकासाठी महत्त्वाचे- दिनेश कार्तिक  title=

कोलकाता : आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी केकेआरनं त्यांची जर्सी लॉन्च केली आहे. गौतम गंभीरची जागा घेणं कठीण असल्याची कबुली यावेळी केकेआरचा कॅप्टन दिनेश कार्तिकनं दिली आहे. पण केकेआरची टीम प्ले ऑफपर्यंत पोहोचेल असा विश्वास कार्तिकनं व्यक्त केला आहे.

दीपिकासाठी २ आठवडे महत्त्वाचे

दिनेश कार्तिकनं त्याची पत्नी दीपिका पल्लीकलसाठी पुढचे २ आठवडे महत्त्वाचे असल्याचं सांगतिलं आहे. दीपिका ही स्क्वॅश खेळाडू आहे. ४ एप्रिलपासून कॉमनवेल्थ गेम्सना सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये दुसरं सुवर्ण पदक मिळवण्याचा प्रयत्न दीपिका करणार आहे.

चार वर्षांपूर्वी ग्लासगोमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये दीपिकानं सुवर्ण पदक जिंकलं होतं. यावेळीही सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी तिने अथक मेहनत घेतली आहे, असं दिनेश कार्तिक म्हणाला.

'माझ्यावरही दबाव'

केकेआरचा कॅप्टन म्हणून निवड झाल्यामुळे माझ्यावर दबाव आहे. माझ्याबरोबरच टीमकडूनही सर्वोत्तम कामगिरी मला करून घ्यावी लागणार आहे. टीमला प्ले ऑफ पर्यंत पोहोचवायची सगळ्यांचीच अपेक्षा असते. मी ही अपेक्षा पूर्ण करीन, असं वक्तव्य दिनेश कार्तिकनं केलं आहे.

गंभीरची जागा घेणं कठीण

केकेआरनं त्यांना २ वेळा आयपीएल जिंकवून देणाऱ्या गौतम गंभीरला कायम ठेवलं नाही. त्याच्याऐवजी कार्तिकला ७.४ कोटी रुपये देऊन विकत घेण्यात आलं. गंभीरनं जे मिळवलं ते शानदार आहे, असं कार्तिक या कार्यक्रमात म्हणाला. गंभीरच्या नेतृत्वात केकेआर २०१२ आणि २०१४ साली चॅम्पियन झाली. तर २०११, २०१६ आणि २०१७ साली प्ले ऑफला पोहोचली.