IPL 2024 Shubman Gill Talks About Captainship: आयपीएल 2024 च्या लिलावाआधी खेळाडूंच्या ट्रेडींगदरम्यान मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला पुन्हा संघात घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. गुजरात टायटन्सला सलग 2 वेळा आयपीएल फायनलपर्यंत पोहचवणारा आणि पहिल्याच पर्वात संघाला जेतेपद मिळवून देणारा कर्णधार हार्दिक पंड्या पुन्हा मुंबईच्या संघात सहभागी झाला आहे. मुंबईने ऑल कॅश डीलमध्ये गुजरातकडून पंड्याला मुंबईच्या संघात सहभागी करुन घेतलं. यानंतर गुजरात टायटन्सने शुभमन गिलला कर्णधार म्हणून जाहीर केलं.
शुभमन गिलला कर्णधार म्हणून जाहीर केल्यानंतर गुजरात टायटन्सने सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये नवनियुक्त कर्णधार शुभमन गुजरात टायटन्सच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. आयपीएलच्या संघाचं नेतृत्व करणं हे आपलं स्वप्न साकार होण्यासारखं आहे, असं शुभमन गिलने म्हटलं आहे. पुढे बोलताना शुभमनने कर्णधारपदाबरोबरच बरीच जबाबदारी खांद्यावर पडते असंही म्हटलं आहे. कर्णधारपद हे 4 प्रमुख स्तंभांवर आधारित आहे. हे 4 स्तंभ म्हणजे कष्ट, शिस्त, बांधिलकी, निष्ठा असे आहेत, असंही शुभमन म्हणाले. शुभमनचं हे विधान हार्दिकसाठी होतं की काय अशी चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे. काहींनी बांधिलकी आणि निष्ठा या शब्दांचा उल्लेख करत शुभमनने अप्रत्यक्षपणे हार्दिकवर तर निशाणा साधला नाही ना अशी शंका उपस्थित केली आहे.
"आम्ही जोपर्यंत आमचा पहिला सामना खेळत नाही तोपर्यंत माझा यावर विश्वास बसणार नाही की मी कर्णधार आहे. मला फार भारी वाटतंय. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की कर्णधारपदाबरोबर अनेक गोष्टी येतात. बांधिलकी ही गोष्ट यापैकीच एक आहे. तसेच शिस्त, कष्ट आणि निष्ठा या गोष्टीही कर्णधारपदाबरोबरच येतात," असं शुभमनने म्हटलं आहे. शुभमनचा हा व्हिडीओ गुजरात टायटन्सच्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. ज्यांनी कर्णधारपद भूषवलं आहे अशा खेळाडूंकडून पाठिंबा मिळेल असा विश्वास या व्हिडीओमध्ये शुभमने व्यक्त केला आहे. "आमच्या संघामध्ये अनेक उत्तम नेतृत्व करणारे खेळाडू आहेत. यामध्ये केन विल्यम्सन, राशीद भाई (राशीद खान), डेव्हिड, वृद्धी भाई हे सारेच आहेत," असं शुभमन म्हणाला.
From a dreamy eyed fanboy of the IPL to a captain of the Gujarat Titans! Aapdo Shubman is raring to own his latest designation! Hear his first words from a brand new chapter... #TitansFAM, ready for a new era of leadership? #AavaDe pic.twitter.com/vmIN7I4LQY
— Gujarat Titans (@gujarat_titans) November 29, 2023
शुभमन गिलला हार्दिक पंड्याची जागा घेणं हे फार आव्हानात्मक असणार आहे. 2022 मध्ये पहिल्याच पर्वात नेतृत्व करताना हार्दिक पंड्याने पहिल्याच पर्वात संघाला चषक मिळवून दिला. त्याने या पर्वामध्ये 15 सामन्यांमध्ये 487 धावा केल्या होत्या. 24 वर्षीय शुभमन गिलनेही फलंदाजीने आयपीएलमध्ये आपला प्रभाव पाडला आहे. शुभमन हा 2023 च्या पर्वामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी होता. गुजरातकडून खेळताना शुभमनने 17 सामन्यांमध्ये 890 धावा केल्या. त्याने 4 अर्धशतकं झळकावली.