भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि साहाय्यक प्रशिक्षकांचा करार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने वर्ल्डकप स्पर्धा संपल्यानंतर कार्यकाळ संपत असल्याने राहुल द्रविडशी चर्चा करुन हा निर्णय घेतला. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी आघाडीचा फलंदाज गौतम गंभीरने या निर्णयाचं स्वागत केलं असून वर्ल्डकप अवघ्या काही महिन्यांवर असताना हे फारच आशादायी असल्याचं म्हटलं आहे. राहुल द्वविडची प्रशिक्षकपदाची ही दुसरी इनिंग 10 डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासह सुरु होणार आहे. या दौऱ्यात 3 एकदिवसीय, टी-20 आणि 5 कसोटी सामने खेळले जाणार आहेत. तसंच जूनमधील टी-20 वर्ल्डकपआधी भारत इंग्लंडचा दौरा करेल. येथे 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल.
गौतम गंभीरने भारतीय संघ चांगलं क्रिकेट खेळत आपला दबदबा कायम ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसंच टी 20 हा वेगळा प्रकार असून, राहुल आणि सपोर्ट स्टाफ हे आव्हान पेलतील अशीही आशा त्याने बोलून दाखवली. राहुल द्रविडसह फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे टीम इंडियासोबत त्यांचा कार्यकाळ सुरू ठेवतील.
"टी-20 वर्ल्डकप आता काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना, तुमचीही संपूर्ण सपोर्ट स्टाफ बदलण्याची इच्छा नसेल. राहुल द्रविडने ऑफर स्विकारली हे बरं झालं. आपण चांगलं क्रिकेट खेळत दबदबा कायम ठेवू अशी आशा आहे. टी-20 हा फार वेगळा आणि आव्हानात्मक प्रकार आहे. राहुल आणि सपोर्ट स्टाफ चांगला निकाल देतील अशी आशा आहे. त्यांचं अभिनंदन," असं गौतम गंभीरने म्हटलं आहे.
2021 मधील निराशाजनक ICC T20 विश्वचषक मोहिमेनंतर राहुल द्रविडने रवी शास्त्रींची जागा घेतली होती. राहुल द्रविडची 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती करण्यात आली होती. वर्ल्डकपमधील जबरदस्त कामगिरीनंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपुष्टात आला होता.
बीसीसीआयने मुदतवाढ दिल्यानंतर राहुल द्रविडने म्हटलं आहे की, "टीम इंडियासोबतची गेली दोन वर्षं संस्मरणीय राहिली आहेत. या प्रवासात आम्ही फार चढउतार पाहिले. यादरम्यान मिळालेला पाठिंबा अदभूत होता. ड्रेसिंग रूममध्ये आम्ही स्थापित केलेल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो. आमच्या संघाकडे असलेली कौशल्ये आणि प्रतिभा अभूतपूर्व आहे. आम्ही योग्य प्रक्रियेचे अनुसरण करणं आणि तयारीशी चिकटून राहणे यावर भर दिला आहे ज्याचा एकूण निकालावर थेट परिणाम झाला आहे."
या काळात मला दिलेला पाठिंबा आणि माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी बीसीसीय आणि अधिकाऱ्यांचे आभार मानतो. या कार्यकाळात मला कुटुंबापासून दूर राहावं लागलं. माझ्या कुटुंबाने दिलेला पाठिंबा आणि बलिदान यासाठी मी त्यांचाही आभारी आहे असं राहुल द्रविड म्हणाला आहे.