'रोहित एवढा चांगला कर्णधार होता तर मुंबईने..'; उत्तर देण्यासाठी माईक उचलला पण..; पाहा Video

IPL 2024 Mumbai Indians Question To Hardik Pandya On Rohit Sharma: मुंबई इंडियन्सच्या संघाने हार्दिकला पुन्हा संघात घेत चाहत्यांना धक्का दिला. मात्र त्याहून मोठा धक्का चाहत्यांना तेव्हा बसला ज्यावेळेस रोहित शर्माला डच्चू देत पंड्याकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 19, 2024, 08:58 AM IST
'रोहित एवढा चांगला कर्णधार होता तर मुंबईने..'; उत्तर देण्यासाठी माईक उचलला पण..; पाहा Video title=
यंदा नेतृत्व हार्दिक पंड्या करणार

IPL 2024 Mumbai Indians Question To Hardik Pandya On Rohit Sharma: इंडियन प्रिमिअर लीगचं 2024 चं पर्व येत्या शुक्रवारी म्हणजेच 22 तारखेला सुरु होणार आहे. या पर्वाच्या आधीच मुंबई इंडियन्सच्या संघाने कर्णधारपदी हार्दिक पंड्याला नियुक्त केल्याने मोठा वाद निर्माण झाला. मागील अनेक वर्षांपासून संघाचं नेतृत्व करणाऱ्या आणि 5 वेळे जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माऐवजी हार्दिकला अचानक कर्णधार घोषित केल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियापासून ते क्रिकेट वर्तुळातील दिग्गजांपर्यंत अनेकांनी यावर मतं मांडली. गुजरात टायटन्सच्या संघाकडून प्लेअर्स ट्रेडमध्ये हार्दिकला मुंबईच्या संघाने पुन्हा संघात स्थान घेत थेट कर्णधार केलं. अनेकांना हा निर्णय पटला नाही. 

रोहितसंदर्भात प्रश्न विचारला

सोमवारी मुंबई इंडियन्सच्या संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये कर्णधार हार्दिक पंड्या आणि संघाचा प्रमुख प्रशिक्षक मार्क बाऊचर सहभागी झाले होते. या दोघांनी संघाची भूमिका मांडली आणि वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. मात्र यावेळेस दोघांनीही कर्णधारपदाचा निर्णय असा तडकाफडकी का घेण्यात आला या प्रश्नाचं उत्तर टाळलं. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या अनेक व्हिडीओमध्ये या दोघांनी जाणीवपूर्वकपणे या प्रश्नाचं उत्तर टाळल्याचं दिसून आलं. 

रोहित उत्तम नेतृत्व करत होता तर...

रोहित शर्माचं नेतृत्व उत्तम होतं तर संघ व्यवस्थापनाने त्याच्याऐवजी हार्दिक पंड्याला कर्णधार म्हणून का नियुक्त केलं? असा प्रश्न पत्रकाराने विचारला. मात्र या प्रश्नाला हार्दिक आणि मार्क या दोघांपैकी कोणीच उत्तर दिलं नाही. उत्तर न देताच दोघांनी पुढील प्रश्न घेतला. रोहितला हटवून हार्दिकला का कर्णधार करण्यात आलं? हा प्रश्नही मार्कने टाळला. मार्कने प्रश्न सुरु असतानाच उत्तर देण्यासाठी माईक उचलला. मात्र संपूर्ण प्रश्न ऐकल्यावर त्याने काहीच उत्तर दिलं नाही. त्याने केवळ मान डोलावत नाही सांगता येणार असं देहबोलीतूनच स्पष्ट केलं. हार्दिक पंड्याही या प्रश्नावर एक शब्दही बोलला नाही. दोघांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

सर्व काही सुरळीत असेल तर या प्रश्नाचं उत्तर का देण्यात आलं नाही? असा प्रश्नही चाहत्यांनी विचारला आहे.

अन्य एका व्हिडीओमध्ये हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवण्यासंदर्भातील प्रश्न विचारताना त्याला कर्णधार नेमता कोणत्या अटी ठेवण्यात आल्या आहेत? मात्र या प्रश्नालाही हार्दिकने कोणतेच उत्तर दिले नाही. चाहत्यांच्या भावनांना काही किंमत आहे की नाही? असा प्रश्नही चाहत्यांनी विचारला आहे.

मात्र अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना हार्दिकने, माझ्यात आणि रोहितमध्ये संवाद साधण्यात कोणताच अडथळा नाही. रोहितचा अनुभव आम्हाला फार फायद्याचा ठरणार असून तो कायमच मला पाठिंबा देत असल्याचं हार्दिकने आवर्जून नमूद केलं.