IPL 2024: लखनऊ सुपरजायंट्सचा डावखुरा गोलंदाज एम सिद्धार्थ पहिल्याच आयपीएल सामन्यात विराट कोहलीची विकेट मिळवण्याची कामगिरी केली आहे. यासह त्याने लखनऊ सुपरजायंट्सचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी दिलेलं आश्वासनही पूर्ण केलं. तू विराट कोहलीची विकेट मिळव असं त्यांनी सागितलं होतं. एम सिद्धार्थने यावर 'हो सर' असं उत्तर दिलं होतं. पण जस्टीन लँगर यांना एम सिद्धार्थ ही कामगिरी खरंच करुन दाखवेल असं वाटलं नव्हतं.
बंगळुरुविरोधातील सामन्यात एम सिद्धार्थने विराट कोहलीची विकेट घेत क्रिकेटमध्ये आपल्या नावाची दखल घेण्यास सर्वांना भाग पाडलं. 25 वर्षीय एम सिद्धार्थसाठी ही त्याची पहिलीच विकेट ठरली. एम सिद्धार्थने पंजाब किंग्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. पण त्यावेळी त्याला एकही विकेट मिळाली नव्हती.
एम सिद्धार्थचं इरफान पठाणप्रमाणे जलद गोलंदाज होण्याचं स्वप्न होतं. पण गोलंदाजीत वेग नसल्याचं सांगण्यात आल्यानंतर तो फिरकी गोलंदाजीकडे वळला होता. पण त्याचं चेंडू स्विंग करण्याचं कौशल्य मात्र तसंच होतं. हवेत चेंडू फिरवणाऱ्या जलद डिलिव्हरीसाठी तो ओळखला जातो. अनुभवासह, त्याने आता वेगात फरक आणल आहे. ज्यामुळे फलंदाजांना त्याच्यासमोर खेळणं कठीण जात आहे. विराट कोहलीही त्याच्या जाळ्यात अडकला.
विराट कोहली सामन्यात चांगला खेळत असल्याने एम सिद्धार्थने त्याची विकेट मिळवत संघाला मोठं यश मिळवून दिलं. विराट कोहली 22 धावांवर बाद झाला. लखनऊने हा सामना अत्यंत सहजपणे 28 धावांनी जिंकला. या विजयासह लखनऊचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. दरम्यान, लखनऊने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये कोच लँगर एम सिद्धार्थबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय होती याबद्दल सांगितलं.
"मी त्याच्याशी याआधी बोललो नव्हतो. मी त्याला गोलंदाजी करताना पाहिलं. त्याला भेटल्यानंतर पहिली गोष्ट माझ्या डोक्यात आली की, तू विराटला आऊट करु शकतोस का? त्यावर त्याने 'हो सर' असं उत्तर दिलं. आणि त्याने काय केल? त्याने खरंच विकेट काढली," असं लँगर यांनी सांगताच ड्रेसिंग रुममध्ये सर्व खेळाडूंनी जल्लोष केला.
एम सिद्धार्थने आपण नेहमीच विराट कोहलीला बाद करण्याचं स्वप्न पाहिलं होतं असं सांगितलं आहे. "मी नेहमीच विराटची विकेट घेण्याचं स्वप्न पाहिलं होतं. तुम्ही कोणालाही विचारु शकता. ही सर्वात मोठी विकेट आहे. मी फार आनंदी आहे. मला गोष्टी फार सहज ठेवायच्या होत्या. मी माझ्या जमेच्या बाजूंवर काम केलं. मी योग्य ठिकाणी चेंडू टाकत संघाला यश मिळवून देऊ शकतो याची खात्री होती," असं एम सिद्धार्थ म्हणाला आहे.
इंडोनेशियातील जकार्ता येथे जन्मलेल्या सिद्धार्थने क्रिकेटचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी लहान वयातच चेन्नईला स्थलांतर केले. आयपीएलमधील सिद्धार्थची ही दुसरी इनिंग आहे. 2019 मध्ये तमिळनाडूसाठी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत चांगली कामगिरी केल्यानंतर आयपीएल 2020 च्या आधी कोलकाता नाइट रायडर्सने त्याची निवड केली होती. पण त्याला एकाही सामन्यात संधी न देता सोडण्यात आलं. यानंतर तो दिल्ली कॅपिटल्स संघात होता. यूएईमध्ये स्पर्धेचा दुसरा टप्पा खेळला जात असताना त्याला दुखापत झाली आणि त्याला पुन्हा एकदा संघातून मुक्त करण्यात आलं.
त्यानंतर त्याने मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जसोबत नेट बॉलर म्हणून दोन सीझन खेळले. 17 व्या हंगामासाठी लखनऊने लिलावात 2.4 कोटींसह त्याला संघात घेतलं.