IPL 2024 If Hardik Pandya Made Mumbai Indians Captain: इंडियन प्रिमिअर लीगच्या 2024 च्या पर्वामध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व कोण करणार यासंदर्भातील संभ्रम कायम आहे. यंदाच्या पर्वापासून नेतृत्वाची धुरा हार्दिक पंड्याकडे सोपवली जाणार की रोहित शर्माच नेतृत्व करणार हे अद्याप संघ व्यवस्थापनानेही स्पष्ट केलेलं नाही. सध्या देशभरातील क्रिकेट चाहत्यांना हाच प्रश्न पडला आहे. आयपीएल 2024 ची रिटेंशन प्लेअर्सची यादी जारी करण्यात आली. यामध्ये हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सकडे परतणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. गुजरात टायटन्सच्या संघाला एकदा जेतेपद आणि दुसऱ्यांदा उपविजेतेपद मिळवून दिल्यानंतर हार्दिक स्वगृही परणार आहे. रिटेंशन लिस्टच्या यादीत आधी हार्दिकचं नाव गुजरातच्या संघामध्ये कर्णधार म्हणून होतं. मात्र अगदी शेवटच्या क्षणी हार्दिकला मुंबईच्या संघात घेण्याचा निर्णय झाला.
मुंबई इंडियन्सच्या टॅलेंट डेव्हलपमेंट विंगने 2015 च्या लिलावामध्ये अवघ्या 10 लाखांमध्ये हार्दिकला संघात घेतलं होतं. यानंतर तो 2022 साली पहिल्यांदा संघापासून वेगळा झाला. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सच्या संघाला थेट जेतेपदापर्यंत घेऊन गेला. मात्र आता 2 वर्ष गुजरातचं नेतृत्व केल्यानंतर पंड्या पुन्हा मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सकडून हार्दिक पंड्याला ट्रेड केलं आहे. पाचवेळा इंडियन प्रिमिअर लिगच्या चषकावर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाने हार्दिकसाठी 15 कोटी रुपये मोजले असून या व्यतिरिक्त बरीच रक्कम ट्रान्सफर फी म्हणूनही मोजली. मात्र रोहितसारखा कर्णधार असताना हार्दिकला संघात स्थान देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अगदी शेवटच्या क्षणी झालेल्या या निर्णयाच्या दुसऱ्या दिवशी आयपीएलकडून यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. मात्र हार्दिक पंड्याला कर्णधार करण्याच्या दृष्टीकोनातून त्याला मुंबई इंडियन्सच्या संघात स्थान देण्यात आलं असेल तर रोहित शर्मा कसा प्रतिसाद देईल याबद्दल एका वरिष्ठ खेळाडूने आपलं मत व्यक्त केलं आहे. हार्दिकला मुंबई इंडियन्सचा कर्णधार करण्यात आलं तर रोहित शर्मा ही सारी स्थिती अगदी शांतपणे हाताळेल. भारतीय संघाच्या कर्णधाराला कोणत्याही पद्धतीचा अहंकार नाही, असं भारतीय फिरकीपटू आर. अश्वीनने म्हटलं आहे. "रोहित शर्मा अहंकारी नाही. तो फार चांगला व्यक्ती असून उत्तम नेतृत्व करणारा आहे. तो हे सारं (हार्दिकला कर्णधार करण्याचा निर्णय घेतल्यास जे घडेल ते सारं) काही उत्तम पद्धतीने हाताळेल," असं आर. अश्विनने युट्यूब चॅनेलवर माजी क्रिकेटपटू एस. बद्रीनाथ यांच्याशी बोलताना म्हटल्याचं पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
"आयपीएलच्या इतिहासामध्ये अव्वल चार ते पाच संघ वगळता सर्वांनी खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. मुंबई आणि सीएसकेने असं कधीच केलं नाही. मी हार्दिकला चांगलं ओळखतो. मला जे काही घडलं ते फार महत्त्वाचं आणि बदल घडवणारं वाटतं," असं अश्विन हार्दिकच्या ट्रेडबद्दल म्हणाला.