IPL 2023 playoffs Scenario: गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) संघाने विराट कोहली (Virat Kohli) आणि फाफ ड्युप्लेसिसच्या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादच्या (SHR) संघावर 8 विकेट्सने दमदार विजय मिळवला. या विजयाबरोबरच आरसीबीचा प्लेऑफ्सचा मार्ग सुखकर झाला आहे. आरसीबीने (RCB vs SHR) हा विजय मिळवत प्लेऑफ्समध्ये जाण्यासंदर्भातील सर्व शक्यतांमध्ये आपल्याच हाती सूत्र राहतील हे सुनिश्चित केलं आहे. म्हणजेच इतर संघांच्या कमागिरीवर आरसीबीला अवलंबून रहावं लागणार आहे. मात्र आरसीबीच्या या विजयामुळे मुंबई इंडियन्सचं गणित अधिक किचकट झालं आहे.
चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स दोन्ही संघ जास्तीत जास्त 17 गुणांपर्यंत झेप घेऊ शकतात. मुंबईला जास्तीत जास्त 16 गुण मिळवता येतील. हैदराबादविरुद्धच्या विजयामुळे 14 गुणांसहीत आरसीबीने चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. आरसीबीचा नेट रनरेट 0.180 इतका आहे. तर मुंबईसुद्धा अंतिम सामना जिंकून 16 गुणांपर्यंत मजल मारु शकते. सध्या 14 गुण असले तरी नेट रन रेट -0.128 असल्याने ते आरसीबीच्या खाली आहेत. त्यामुळेच मुंबईला आपला शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे.
अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास आरसीबीने त्यांचा गुजरात जायंट्सविरुद्धचा सामना अगदी 1 धावाने जिंकला तरी मुंबईला वानखेडेच्या मैदानावरील शेवटच्या सामन्यात मोठा विजय आवश्यक असेल. हैदराबादविरुद्धचा शेवटचा सामना मुंबईला किमान 79 धावांनी जिंकावा लागेल. असं झालं तरच मुंबई नेट रन रेटमध्ये आरसीबीच्या पुढे जाईल. या सर्व जर तर मध्ये आरसीबी साखळी फेरीमधील आपल्या शेवटचा सामना गुजरातविरुद्ध खेळणार असल्याने किती मोठा विजय मिळवायचा आणि प्लेऑफ्ससाठी स्थान निश्चित कसं करायचं याची पूर्ण कल्पना आरसीबीला असेल.
मुंबई पराभूत झाली आणि आरसीबी अंतिम सामन्यामध्ये पराभूत झाली तरी आरसीबी क्वालिफाय होण्याची शक्यता अधिक आहे. फक्त इतर कोणताही संघ 14 गुणांपर्यंत मजल मारुन नेट रन रेटमध्ये आरसीबीला मागे टाकणार नाही यासाठी विराटच्या संघाला देव पाण्यात ठेवून बसावं लागेल. सध्या राजस्थान रॉयल्सचा संघ हा नेट रन रेटमध्ये आरसीबीच्या फार जवळ आहे. राजस्थानचा नेट रन रेट 0.140 इतका आहे. त्यामुळे आरसीबीचा संघ एका धावेने अंतिम सामन्यात पराभूत झाला तर राजस्थानला त्यांचा अंतिम सामना किमान 10 धावांच्या फरकाने जिंकावा लागेल.
कोलकाता नाईट राडर्सचा नेट रन रेन हा -0.256 इतका आहे. पंजाबचा नेट रन रेट -0.308 इतका आहे. या दोन्ही संघांना आरसीबीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. म्हणजेच आरसीबीचा 30 धावांनी पराभव झाला तरी केकेआरला त्यांच्या अंतिम सामना हा किमान 78 धावांनी जिंकावा लागेल. तर पंजाबला त्यांचा अंतिम सामना 94 धावांना जिंकावा लागेल तरच ते नेट रन रेटमध्ये आरसीबीच्या पुढे जातील.
म्हणजेच आरसीबीचा संघ हा अंतिम सामन्यात पराभूत झाला तरी तो क्वालिफाय होऊ शकतो फक्त यासाठी मुंबई आणि राजस्थानच्या संघांचाही त्यांच्या त्यांच्या अंतिम सामन्यात पराभव होणं आवश्यक आहे. दुसरीकडे राजस्थानच्या संघाने पंजाबला पराभूत केलं आणि मुंबई तसेच आरसीबी आपले शेवटच्या सामन्यांमध्ये पराभूत झाले तर राजस्थानचा संघ क्वालिफाय होईल. असं असलं तरी नकारात्माक नेट रन रेट असलेल्याने पंजाब आणि राजस्थानला क्वालिफाय होण्यासाठी बरेच प्रयत्न करण्याबरोबरच इतरांच्या कमागिरीवरही अवलंबून रहावं लागणार आहे.
आरसीबीने हैदराबादमध्ये मिळवलेल्या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्सचंही गणित अधिक गुंतागुंतीचं झालं आहे. हे दोन्ही संघ अद्याप प्लेऑफ्ससाठी पात्र ठरलेले नाहीत. आरसीबीचा पराभव झाला असता तर हे दोन्ही संघ पात्र ठरले असते. मुंबई आणि आरसीबीच्या संघाने आपआपले शेवटचे सामने जिंकले तर लखनऊ आणि चेन्नईला त्यांचे शेवटचे सामने जिंकणे अनिवार्य असणार आहे.