Delhi Capitals Captain 2023: दिल्ली कॅपिटल्सकडून नव्या Captain ची घोषणा! अक्षर पटेल Vice Captain

IPL 2023 Delhi Capitals Captain: दिल्ली कॅपिटल्स संघाकडून यंदाच्या पर्वामध्ये ऋषभ पंत खेळताना दिसणार नाही. पंत हा सध्या अपघातात झालेल्या दुखापतीमुळे मैदानापासून दूर असल्याने संघ व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेतला आहे.

Updated: Feb 23, 2023, 04:12 PM IST
Delhi Capitals Captain 2023: दिल्ली कॅपिटल्सकडून नव्या Captain ची घोषणा! अक्षर पटेल Vice Captain title=
Akshar patel delhi capital

Delhi Capitals Captain 2023: दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) संघाने आयपीएल 2023 साठी (IPL 2023) आपल्या संघाच्या कर्णधाराची घोषणा केली आहे. 30 डिसेंबर 2022 ला उत्तराखंडमध्ये झालेल्या एका भीषण कार अपघातामध्ये थोडक्यात प्राण वाचलेला ऋषभ पंत (Rishabh Pant) उपचारांमुळे मैदानापासून दूर आहे. पंत आयपीएलही खेळणार नाही. पंतला झालेली दुखापत पाहता त्याच्या जखमा पूर्णपणे भरण्यासाठी बराच कालावधी लागणार असल्याने मार्चच्या शेवटी सुरु होणाऱ्या यंदाच्या आयपीएल पर्वालाही पंत मुकणार आहे. मागील दोन महिन्यांपासून उपचार घेत असणाऱ्या पंतने काही आठवड्यांपूर्वी रिकव्हरी करत असल्याचा चालतानाचा फोटो पोस्ट केला होता. असं असतानाच आता दिल्ली कॅपीटल्सने एका धडाकेबाज फलंदाजाच्या खांद्यावर संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवली आहे.

ही व्यक्ती असणार दिल्लीचा कर्णधार

दिल्ली कॅपीटल्सने मोठा निर्णय घेताना यंदाच्या पर्वामध्ये पंत खेळणार नसल्याने ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. डेव्हिड वॉर्नरबरोबरच संघाने उपकर्णधाराचीही घोषणा केली आहे. दिल्लीच्या संघाचं उपकर्णधारपद भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलकडे सोपवण्यात आलं आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार डेव्हिड वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या मॅनेजमेंटशी संबंधित एका सदस्याने, "डेव्हिड वॉर्नर आमच्या संघाचा कर्णधार असेल आणि अक्षर पटेल उपकर्णधार म्हणून दिसेल," असं सांगितलं. मात्र संघाने यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

पहिल्यांदाच दिल्ली जिंकणार आयपीएल?

दिल्ली कॅपिटल्सचा संघ एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकलेला नाही. असं असतानाच डेव्हिड वॉर्नर आपल्या आक्रमक नेतृत्वाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सला पहिलंवहिलं जेतेपद मिळवून देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. डेव्हिड वॉर्नरने आपल्या नेतृत्वामध्ये 2016 साली सनरायझर्स हैदराबादच्या संघाला आयपीएलचं जेतेपद मिळवून दिलं होतं. वॉर्नरकडे आयपीएलमध्ये संघाचं नेतृत्व करण्याचा मोठा अनुभव आहे. याच सर्व गोष्टी लक्षात घेत वॉर्नरकडे कर्णधारपदाची सूत्र सोपवण्यात आली आहेत.

पंतवर उपचार सुरु

ऋषभ पंतवर आधी उत्तराखंडमध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर मुंबईमध्ये पंतवर उपचार करण्यात आले असून सध्या तो रिकव्हरी फेजमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने स्वत:चा कुबड्यांच्या आधाराने चालताना फोटो पोस्ट केला होता. एक पाऊल पुढे, एक पाऊल अधिक सक्षम आणि एक पाऊल सुधारणेकडे अशा अर्थाची कॅप्शन पंतने या फोटोला दिली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही अनिश्चित काळासाठी पंत खेळणार नसल्याचं याआधीच स्पष्ट केलं असून यंदाच्या आयपीएलमध्येही पंत खेळताना पहायला मिळणार नाही. वर्षाच्या शेवटी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेमध्ये पंत दिसणार की नाही हे त्याच्या रिकव्हरीवर अवलंबून आहे.