IPL 2023: नेट बॉलर ते गुजरात टायटन्सचा मॅच विनर खेळाडू, शर्माने सर्वांना 'मोहित' केलं

IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात गतविजेत्या गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत मोठ्या ऐटीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीतही गुजरात मुंबईवर भारी पडली.

राजीव कासले | Updated: May 27, 2023, 04:17 PM IST
IPL 2023: नेट बॉलर ते गुजरात टायटन्सचा मॅच विनर खेळाडू, शर्माने सर्वांना 'मोहित' केलं title=

GT vs MI, Indian Premier League 2023: गुजराज टायटन्सने (Gujrat Titans) दुसऱ्या क्वालिफायनर राऊंडमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) तब्बल 62 धावांनी दारुण पराभव केला. या विजयाबरोबरच गुजरातने सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या (IPL 2023) अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण सामन्यावर गुजरातचं वर्चस्व राहिलं. फलंदाजी आणि गोलंदाजीतही गुजरातचे खेळाडू अव्वल ठरले. फलंदाजी करताना शुभमन गिलने (Shubhaman Gill) मुंबईच्या गोलंदाजांची पिसं काढली तर गोलंदाजीत मोहित शर्मासमोर (Mohit Sharma) मुंबईच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. मोहित शर्माने 2.2 षटकात अवघ्या 10 धावा देत 5 विकेट घेतल्या. 

मोहितचा प्रेरणादायी प्रवास
34 वर्षांच्या मोहित शर्माच्या आयपीएलमधल्या पुनरागमनाची गोष्ट प्रेरणादायी आहे. 2022 आयपीएल स्पर्धेसाठी खेळाडूंच्या लिलावत एकाही संघाने मोहित शर्माने बोली लावली नाही. पण मोहित शर्माने हार मानली नाही. गेल्या वर्षी त्याला गुजरात टायटन्समध्ये नेट गोलंदाज (Net Bowler) म्हणून घेण्यात आलं. इथेच हार्दिक पांड्या (Hardik Pandya) त्याच्या गोलंदाजीवर प्रभावित झाला. यंदा म्हणजे सोळाव्या हंगामात हार्दिकने मोहितला थेट प्लेईंग XI (Playing XI) मध्ये संधी दिली. हार्दिकचा हा निर्णय अगदी योग्य ठरला.

मोहितने करुन दाखवलं
आयपीएलच्या जवळपास प्रत्येक सामन्यात हार्दिकने मोहित शर्माला (Mohit Sharma) अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संधी दिली. आयपीएलमध्ये एकीकडे युवा खेळाडू चमकत असताना 34 वर्षांचा मोहित टिकाव धरू शकणार का असा प्रश्न सुरुवातीला विचारला जात होता. पण मोहितने वयाचं बंधन झुगारून दमदारी कामगिरी केली आणि टिकाकारांचं तोंड बंद केलं. आता मोहित गुजरात टायटन्सचा मॅचविनर खेळाडू ठरतोय. गेल्या 13 सामन्यात मोहितने 13.54 च्या रनरेटने तब्बल 24 विकेट घेतल्या आहेत. इतकंच नाही तर पर्पल कॅपच्या लिस्टमध्ये मोहित शर्मा आता मोहम्मद शमी आणि राशिद खाननंतर तिसऱ्या स्थानावर आहे. 

मुंबई विरुद्ध 5 विकेट
मुंबई  विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात मोहितने प्रभावी कामगिरी केली. सामन्याच्या बाराव्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या मोहितने धोकादायक ठरणाऱ्या सूर्यकुमारला क्लिन बोल्ड करत गुजरातचा विजय सोपा केला. त्यानंतर त्याच षटकात विष्णू विनोदाला पॅव्हेलिअनचा रस्ता  दाखवला. त्यानंतर क्रिस जॉर्डन, पियुष चावला आणि कुमार कार्तिकेयला झटपट आऊट करत मोहित शर्माने मुंबईची निम्मी टीम गारद केली आणि गुजरातला थेट फायनलचं तिकिट मिळवून दिलं.

सूर्यकुमारविरुद्ध रणनिती
मुंबईचे तीन विकेट गेल्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानावर तळ ठोकून होता. शमी, राशिद, नूर मोहम्मद या प्रत्येक बॉलरसा तो फोडत होता. त्याचवेळी हार्दिकने डाव टाकला आणि चेंडू मोहित शर्माच्या हाती सोपवला. हार्दिकचा हा डाव अगदी यशस्वी ठरला. मोहितने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये सूर्यकुमारला क्लीन बोल्ड करत गुजरातच्या विजयातला मोठा अडसर दूर केला. यावर बोलताना सूर्यकुमार म्हणाला मी आधीच निश्चित केलं होतं, की सूर्यकुमारविरुद्ध जास्त प्रयोग करायचे नाहीत. त्यामुळे सूर्या अधिक आक्रमक होतो, केवळ लाईन आणि लेंथवर लक्ष केंद्रीत केलं. मोहितचा निर्णय अगदी योग्य ठरला.