IPL 2022 | कोरोनामुळे आयपीएलच्या 15 व्या मोसमातील सर्व सामने महाराष्ट्रात?

IPL 2022 बद्दल मोठी बातमी येत आहे. यंदा आयपीएल महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. 

Updated: Jan 10, 2022, 02:14 PM IST
IPL 2022 |  कोरोनामुळे आयपीएलच्या 15 व्या मोसमातील सर्व सामने महाराष्ट्रात? title=

मुंबई : देशात कोरोनाचा धोका वाढत आहे. गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही आयपीएलवर कोरोनाचं मोठं संकट आहे. अवघ्या काही महिन्यांवर आयपीएलचा 15 वा मोसम येऊन ठेपला आहे. यंदाचा 15 व्या हंगामाचे आयोजन भारतात करण्यात आले आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनासह ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेसाठी प्लॅन बी तयार केला आहे. आयपीएलसाठी मेगा ऑक्शनवरही कोरोनाचं सावट असल्याने तारखांवरही टांगती तलवार आहेच.

IPL 2022 बद्दल मोठी बातमी येत आहे. यंदा आयपीएल महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. आयपीएल 2022 चे सर्व सामने महाराष्ट्रातच होण्याची शक्यता आहे. याआधीही संपूर्ण आयपीएल मुंबईतच होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

आता मुंबईबाहेरील मैदानांचा समावेश करण्याचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. मुंबईत 3 स्टेडियम आहेत, वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि तिसरे डीवाय पाटील स्टेडियम या तीन मैदानांचा सामावेश आहे.

आता महाराष्ट्रात फक्त मुंबईतच हे सामने आयोजित करण्यात येणार की मुंबई-पुणे अशा शहात हे सामने होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुण्याजवळील गहुंजेमध्ये मॅचिंगचा विचार सुरू आहे. गहुंजे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम आहे.

शरद पवारांनी महाराष्ट्रात आयपीएल करण्याच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली असल्याची माहिती BCCI च्या सूत्रांनी दिली आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी या प्रस्तावाला परवानगी देणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

येत्या 10 दिवसांत यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी जर परवानगी दिली तर IPL 2022 महाराष्ट्रामध्ये होऊ शकते. राज्यातही कोरोनाचा संसर्ग वाढतोय त्यामुळे आता नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.