दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, सामन्याआधी वेगवान गोलंदाज कोरोना पॉझिटिव्ह

अक्षर पटेलनंतर आणखी एका गोलंदाजाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, ऋषभ पंतचं वाढल टेन्शन

Updated: Apr 14, 2021, 03:47 PM IST
दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, सामन्याआधी वेगवान गोलंदाज कोरोना पॉझिटिव्ह title=

मुंबई: महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचे रुग्ण वेगानं वाढत आहे. त्याच दरम्यान सुरू असलेल्य़ा IPL सामन्यांवरही कोरोनाचं सावट अधिक गडद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघातील स्टार गोलंदाज अक्षर पटेलला IPL सामने सुरू होण्याआधी कोरोनाची लागण झाल्यानं मोठा धक्का बसला होता. 

ऋषभ पंतच्या नेतृत्वात चेन्नई विरुद्धचा सामना दिल्ली कॅपिटल्स संघ मोठ्या फरकानं जिंकलं. मात्र दुसऱ्या सामन्याआधी आणखी एक धक्का बसला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघातील वेगवान गोलंदाजाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली संघातील वेगवान गोलंदाज एर्निच नॉर्टिए (Anrich Nortje) ला कोरोनाची लागण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा गोलंदाज क्वारंटाइन संपवून नुकताच खेळण्यासाठी मैदानात उतरणार होता. मात्र त्याआधीच त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र पुन्हा केलेल्या चाचणीदरम्यान रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे तो क्वारंटाइन असणार आहे. पुढचे काही सामने तो खेळू शकणार नाही. 

बीसीसीआयच्या नियमानुसार त्याला 10 दिवस सुरक्षित ठिकाणी क्वारंटाइन करण्यात येणार आहे. RT-PCR चाचणी नेगेटिव्ह आल्यानंतरच त्याला पुन्हा बायोबबलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका वन डे सामन्यात त्याने भाग घेतला होता. 

हा सामना खेळून तो भारतात IPLसाठी आला होता. मात्र BCCI च्या नियमानुसार त्याला क्वारंटाइन करण्यात आलं. त्यामुळे पहिल्या सामन्यात तो खेळू शकला नाही. तर आता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं दुसरा आणि तिसरा सामनाही हुकणार आहे.