दुबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या सत्रात चेन्नई सुपर किंग्जचा सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटलशी होणार आहे. मुंबईला पराभूत करून चेन्नईने विजयाची सुरुवात केली, परंतु दुसर्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई संघाचा पराभव केला. राजस्थानविरुद्ध संघाच्या गोलंदाजांनी बरेच रन दिले. ज्यामुळे चेन्नईला विजयासाठी 217 धावांचे आव्हान मिळाले. चेन्नईला सामना 16 धावांनी गमवावा लागला होता. फाफ डु प्लेसिसने चांगली फलंदाजी केली. पण इतर फलंदाजांना चांगली खेळी खेळता आली नाही.
पहिल्या सामन्यात फाफबरोबर अंबाती रायुडूने चांगली कामगिरी केली होती. पण दुसर्या सामन्यात तो खेळू शकला नाही. पहिल्याच चेंडूवर बाद झालेल्या ऋतुराज गायकवाडने त्याची जागा दुसऱ्या सान्यात घेतली होती. आज रायुडू खेळण्याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. शेवटच्या दोन सामन्यात चेन्नईची सलामीची जोडी अपयशी ठरली आहे. ना मुरली विजय चालला ना शेन वॉटसन. दुसर्या सामन्यात या दोघांनाही मोठ्या धावसंख्येसमोर टीमला आवश्यक अशी सुरूवात करुन दिली नाही. चेन्नईची समस्या मध्यम फळीतील फलंदाजांबद्दल ही आहे. केदार जाधव, ऋतुराज, धोनी काही खास कामगिरी करू शकले नाहीत. अखेरच्या दोन्ही सामन्यांमध्ये धोनीने इंग्लंडचा युवा सॅम कुरेनला त्याच्या आधी खेळायला पाठवले होते.
चेन्नईसाठी धोनीचे स्थान चर्चेचा विषय आहे. शेवटच्या सामन्यात धोनीने 7 व्या क्रमांकावर फलंदाजी केली होती, परंतु तो येईपर्यंत आणि ज्याप्रकारे तो सुरुवातीला फलंदाजी करीत होता, त्यावरून बरेच प्रश्न उपस्थित झाले होते. शेवटच्या षटकात त्याने तीन षटकार ठोकले होते, पण संघ जिंकवण्यासाठी ते पुरेसे नव्हते.
रायडूच्या अनुपस्थितीत धोनी आधी येऊन बॅटींग ऑर्डर सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारतो की पुन्हा 7 व्या स्थानी येतो. रवींद्र जडेजाने चार ओव्हरमध्ये 40 रन दिले होते. त्याला विकेट ही मिळाली नव्हती. पीयूष चावला यांच्या अनुभवाचाही संघाला फायदा झाला नाही. या लेगस्पिनरने 4 ओव्हरमध्ये 55 रन देत 1 विकेट घेतली होती.