आयपीएल २०१९: मुंबईची टीम वेगळ्या रुपात दिसणार

२३ मार्चपासून यंदाच्या वर्षीच्या आयपीएलला सुरुवात होत आहे.

Updated: Feb 26, 2019, 07:41 PM IST
आयपीएल २०१९: मुंबईची टीम वेगळ्या रुपात दिसणार title=

मुंबई : २३ मार्चपासून यंदाच्या वर्षीच्या आयपीएलला सुरुवात होत आहे. या मोसमाआधी मुंबईच्या टीमच्या नव्या जर्सीचं अनावरण झालं आहे. एका प्रोमोच्या माध्यमातून कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि जसप्रीत बुमराहनं मुंबईच्या टीमची जर्सी त्यांच्या चाहत्यांना दाखवली. मुंबईच्या टीमनं याचा प्रोमो ट्विटरवर शेअर केला आहे.

लोकसभा निवडणुकींमुळे यंदाच्या वेळी संपूर्ण आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली नाही. निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर बीसीसीआयनं आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा केली. पहिल्या २ आठवड्यांमध्ये २३ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान १७ सामने खेळवण्यात येतील. यंदाच्या आयपीएलची पहिली मॅच चेन्नई आणि बंगळुरूच्या टीममध्ये रंगेल.

मुंबई इंडियन्सची टीम आत्तापर्यंतच्या ११ आयपीएलपैकी ३ आयपीएल जिंकली. सर्वाधिक आयपीएल जिंकण्याचं रेकॉर्ड सध्या मुंबई आणि धोनीच्या चेन्नईच्या नावावर आहे. मुंबई इंडियन्सनं आत्तापर्यंत २०१३, २०१५ आणि २०१७ सालची आयपीएल जिंकली. मागच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये मात्र मुंबईची कामगिरी निराशाजनक झाली. मागच्या मोसमामध्ये मुंबईला प्ले ऑफमध्येही पोहोचता आलं नव्हतं. मागच्या मोसमामध्ये निराशाजनक कामगिरी केलेल्या मुंबईच्या टीमला यावर्षी त्यांचा खेळ सुधारण्याचं आव्हान असेल. यंदाच्या वर्षी मुंबई त्यांचा पहिला सामना २४ मार्चला खेळणार आहे. वानखेडे स्टेडियमवर दिल्लीविरुद्ध ही मॅच होईल

मुंबईच्या मॅचचं वेळापत्रक

२४ मार्च- मुंबई विरुद्ध दिल्ली- वानखेडे स्टेडियम

२८ मार्च- बंगळुरू विरुद्ध मुंबई- चिन्नास्वामी स्टेडियम

३० मार्च- पंजाब विरुद्ध मुंबई- मोहाली स्टेडियम

३ एप्रिल- मुंबई विरुद्ध चेन्नई- वानखेडे स्टेडियम

अशी आहे मुंबईची टीम

रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तरे, क्विंटन डी कॉक, कायरन पोलार्ड, बेन कटिंग, मिचेल मॅकलेनघन, ऍडम मिलन, जेसन बेहरेनड्रॉफ, युवराज सिंह, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत सिंह, बरिंदर सरन, पंकज जासवाल, राशिख सलाम

यंदाच्या वर्षी संपूर्ण स्पर्धा भारतात खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकांच्या तारखांवर उरलेलं वेळापत्रक अवलंबून असेल. २३ मार्चला चेन्नई आणि बंगळुरूमध्ये चेन्नईच्या मैदानात पहिला सामना रंगेल. तर आयपीएलची फायनलही चेन्नईमध्येच होईल.