IPL 2019: मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबचा रडीचा डाव?

कायरन पोलार्डच्या वादळी खेळीमुळे मुंबईने पंजाबचा ३ विकेटने पराभव केला.

Updated: Apr 11, 2019, 05:07 PM IST
IPL 2019: मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबचा रडीचा डाव? title=

मुंबई : कायरन पोलार्डच्या वादळी खेळीमुळे मुंबईने पंजाबचा ३ विकेटने पराभव केला. पोलार्डने ३१ बॉलमध्ये ८३ रनची खेळी केली. यामध्ये १० सिक्स आणि ३ फोरचा समावेश होता. मुंबईला विजयासाठी शेवटच्या बॉलला २ रनची गरज होती. तेव्हा अल्जारी जोसेफने २ रन काढून मुंबईला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

या मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला असला तरी पंजाबने फिल्डिंगवेळी अवलंबलेल्या रणनितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पंजाबची फिल्डिंग सुरु असताना क्रिस गेल आणि फास्ट बॉलर अंकित राजपूत मैदानात नव्हते.

पहिली ओव्हर टाकत असतानाच अंकित राजपूतच्या बोटाला दुखापत झाली होती. यानंतर राजपूतने सुरुवातीच्या ३ ओव्हर टाकल्या. या ३ ओव्हर झाल्यानंतर राजपूत पॅव्हेलियनमध्ये गेला, आणि मॅचची शेवटची ओव्हर टाकण्यासाठी आला.

पंजाबची फिल्डिंग सुरू असताना क्रिस गेलही मैदानात नव्हता. बॅटिंग करत असताना क्रिस गेलने ३६ बॉलमध्ये ६३ रनची खेळी केली. या खेळीनंतर मात्र गेल मैदानात आला नाही. क्रिस गेलच्या पाठीला दुखापत झाल्याचं मॅचनंतर अश्विनने सांगितलं.

जगातला सगळ्यात विस्फोटक बॅट्समन असला तरी क्रिस गेलची फिल्डिंग मात्र फारशी चांगली नाही. तसंच अंकित राजपूतला पहिल्या ओव्हरमध्येच दुखापत झाली होती तरी त्याने पुढच्या २ ओव्हर सलग टाकल्या. मग खरंच अंकित राजपूतची दुखापत फिल्डिंग न करण्याएवढी गंभीर होती का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

दिल्ली टीमचा सहाय्यक प्रशिक्षक असलेल्या मोहम्मद कैफने याआधीही पंजाबच्या टीमवर यावरून आक्षेप घेतले होते. 'दिल्लीविरुद्धच्या मॅचवेळी बॅटिंग करताना पंजाबच्या सरफराज खानच्या हाताला बॉल लागला होता. दुखापत झाल्यामुळे सरफरजा फिल्डिंगला येऊ शकत नाही, असं सांगण्यात आलं. पण बॉल सरफराजच्या ग्लोव्हजला लागला होता. या टीम चलाखी दाखवत असल्या तरी हे योग्य नाही', असं कैफ म्हणाला होता.

कैफने सरफराज खानच्या दुखापतीवरही संशय व्यक्त केला आहे. सरफराजची दुखापत किती गंभीर होती? रणनिती म्हणून सरफराज खानऐवजी करुण नायरला फिल्डिंगला पाठवण्यात आलं का? असे सवाल कैफने उपस्थित केले होते.

मोहम्मद कैफ याने कोलकात्याच्या टीमवरही असे आरोप केले होते. खराब फिल्डरना पॅव्हेलियनमध्ये पाठवून चांगल्या फिल्डरना मैदानात बोलावलं जात आहे, असा आरोप करताना मोहम्मद कैफने काही दाखलेही दिले. 'दिल्ली आणि कोलकातामधल्या मॅचवेळी पियुष चावला ४ ओव्हर टाकून पॅव्हेलियनमध्ये गेला. पियुष चावलाऐवजी रिंकू सिंग फिल्डिंगला आला,' असं कैफ म्हणाला.

३० वर्षांचा पियुष चावला हा काही सर्वोत्तम फिल्डर नाही. तर २१ वर्षांचा रिंकू सिंग हा चपळ फिल्डर आहे. पियुष चावलापेक्षा रिंकू सिंगची फिल्डिंग नक्कीच उजवी आहे.