AFG-PAK सामन्यात तिरंग्याचा अपमान? राष्ट्रध्वज हिसकावणाऱ्या पोलिसावर कारवाई!

AFG vs PAK : पाकिस्तानच्या टीमचा हा सलग तिसरा पराभव होता. दरम्यान या सामन्यामध्ये तिरंग्याचा अपमान झाल्याच्या बातम्या समोर आल्या.

सुरभि जगदीश | Updated: Oct 24, 2023, 09:00 AM IST
AFG-PAK सामन्यात तिरंग्याचा अपमान? राष्ट्रध्वज हिसकावणाऱ्या पोलिसावर कारवाई! title=

AFG vs PAK : वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केला. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या खेळाडूंना 8 विकेट्सने हरवलंय. पाकिस्तानच्या टीमचा हा सलग तिसरा पराभव होता. दरम्यान या सामन्यामध्ये तिरंग्याचा अपमान झाल्याच्या बातम्या समोर आल्या.

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर अफगाणिस्तान विरूद्ध पाकिस्तान यांच्यात हा सामना खेळवला गेला. अनेक भारतीय चाहतेही हा सामना पाहण्यासाठी आले होते. मात्र यावेळी एका पोलीस शिपाई एसआयने भारतीय चाहत्याला तिरंगा स्टेडियममध्ये नेण्यास नकार दिला. त्या SI ने प्रेक्षकांकडून तिरंगा हिसकावून घेतला होता. ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीये. यावरून तिरंग्याचा अपमान झाल्याचं बोललं जातंय.

भाजपच्या प्रदेशाध्याने उठवला आवाज

या सर्व प्रकरणानंतर मोठा गदारोळ झाला. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के. त्यावर अण्णामलाई यांनी जोरदार टीका केलीये. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही केलीये. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, 'आजच्या सामन्यात स्टेडियमबाहेर पोलिसांनी चाहत्यांना भारतीय ध्वज म्हणजेच तिंरगा घेऊन जाऊ दिलं नाही. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनला (TNCA) हा अधिकार कोणी दिला?

त्यांच्या म्हणण्यानुसार, 'राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी याची आम्ही मागणी करतो. द्रमुकने भारतीयांची माफी मागावी. तसं न केल्यास तामिळनाडू भाजप भ्रष्ट द्रमुक सरकारविरोधात आंदोलन करेल.'

घडलेल्या प्रकरणाचा तपास सुरु

तिरंग्याचा अवमान केल्याच्या या प्रचंड वादानंतर आता त्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. यासंदर्भात चेन्नई पोलिसांनी एसआयची ओळख पटवली आहे. 

पोलिसांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटलंय की, 'सामन्यादरम्यान घडलेल्या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. एमएसीने स्टेडियमच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसआयविरोधात चौकशी सुरू केली आहे. त्याला पुन्हा नियंत्रण कक्षात बोलावण्यात आले आहे. चौकशीनंतर कायदेशीर आधारावर कारवाई केली जाईल.