माउंट मोनगानुई : न्यूझीलंड विरुद्ध पाच एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना माउंट मोनगानुई येथे सोमवारी खेळला जाणार आहे. भारताने पहिल्या दोन सामन्यांमध्ये यजमान न्यूझीलंड संघाचा पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेच्या दृष्टीने होणारा सामना हा दोन्ही संघासाठी मह्त्वपूर्ण असणार आहे. आधीचे दोन सामने जिंकल्याने भारतीय संघाचा विश्वास दुणावलेला आहे. त्यामुळे भारतीय संघ मालिका विजयाच्या दृष्टीने खेळायला उतरेल. तर हा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न न्यूझीलंडचा असेल.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपवाद वगळता न्यूझीलंडच्या कोणत्याही खेळाडूला चमकदार कामगिरी करण्यापासून भारतीय गोलंदाजांनी रोखले. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहालच्या फिरकीपुढे न्यूझीलंडच्या संघाने लोटांगण घातलं. या फिरकीपटूच्या जोडीने दोन सामन्यांमध्ये एकूण १२ विकेट मिळवल्या. कुलदीप यादवने दोन्ही सामन्यात प्रत्येकी चार-चार विकेट घेतल्या. तर युजवेंद्र चहालने दोन-दोन विकेट घेतले. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारने, तसेच अष्टपैलू केदार जाधवने गरजेच्या वेळी विकेट घेऊन चांगली कामगिरी केली.
न्यूझीलंड विरुद्धातील दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यात दीडशतकी भागीदारी झाली आहे. त्यामुळे सलामीवीरांची चांगली कामगिरी ही संघासाठी चांगली बातमी आहे. शिखर धवनने पहिल्या सामन्यात नाबाद ७५ तर दुसऱ्या सामन्यात ६६ धावांची खेळी केली. तर रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात ८७ धावा केल्या. या दोघांमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तडाखेदार १५४ धावांची भागीदारी केली. या भागीदारीसोबतच यांनी माजी सलामीवीर जोडी सचिन-सेहवाग यांचा विक्रम मोडला. रोहित आणि धवन मध्ये आता पर्यंत पहिल्या विकेटसाठी १४ वेळा १०० पेक्षा धावांची भागीदारी झाली आहे.
सोबतच कर्णधार विराट देखील फॉर्ममध्ये आहे. मधल्या फळीतील अंबाती रायुडुने दुसऱ्या सामन्यात ४७ धावांची खेळी केली. दुसऱ्या सामन्यात धोनी आणि केदार जाधव या जोडीने जलद धावा जोडून भारताची धावफलक ३०० च्या पार नेला.
एकूणच पाहता, भारतीय संघाच्या फंलदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणचाचा दर्जा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत वधारला आहे. भारताला परदेश दौऱ्यावर असताना अनेकदा गोलंदाजांची प्रतिकूल कामगिरी विजयाच्या आड यायची. पण आता तसे होत नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी सांगता केल्यानंतर या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून, भारताला मालिका विजय करुन देण्याचा प्रयत्न कर्णधार कोहलीचा असेल. तिसऱ्या सामन्यानंतर बीसीसीआयने कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
कॉफी विथ करण या शोमध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या हार्दिक पांड्यावरचे निलंबन उठवल्याने अंतिम-११ मध्ये खेळण्याची संधी त्याला मिळू शकते. पांड्याला संघात विजय शंकरच्या जागी स्थान दिले जाऊ शकते. यामुळे संघात अष्टपैलू खेळाडूचा समावेश असेल. कोहलीने काही दिवसांपूर्वी, संघात अष्टपैलू खेळाड़ू नसल्यास तिसरा गोलंदाज खेळवावा लागतो, या शब्दात खंत व्यक्त केली होती.
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, विजय शंकर, शुभमन गिल, युजवेंद्र चहाल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, रविंद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या.
न्यूझीलंड संघ : केन विलियमसन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लेथन, मार्टिन गुप्टील, कोलिन डि ग्रेंडहोम, ट्रेंट बोल्ट, हेनरी निकोल्स, डग ब्रसवेल, लोकी फ्रग्युर्सन, मेट हेनरी, कोलिन मुनरो, इश सोढी, मिशल सेंटनर आणि टिम साऊथी.
उद्या (२८ जानेवारी) सकाळी ७.३० पासून थेट सामना पाहता येईल.
स्टार स्पोर्ट्सवर या सामन्याचं थेट प्रक्षेपण असेल, तर हॉटस्टारवरून सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येईल.