रोहित शर्माला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाची नवी रणनिती

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २१ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Updated: Nov 19, 2018, 09:49 PM IST
रोहित शर्माला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाची नवी रणनिती title=

गाबा : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २१ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यामध्ये विराट कोहलीबरोबरच रोहित शर्मालाही रोखण्याचं आव्हान ऑस्ट्रेलियाच्या बॉलरपुढे असणार आहे. विराटबरोबच रोहित शर्माची कामगिरीही ऑस्ट्रेलियामध्ये चांगली झाली आहे. रोहितनं आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये १६ वनडेत ५७.५० च्या सरासरीनं ८०५ रन केले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या बॉलरना विराटबरोबरच रोहित शर्माही भारताचा हुकमी एक्का वाटतोय. रोहित शर्माला लवकर आऊट घेण्यासाठी आमच्याकडे रणनिती तयार असल्याचा दावा ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर नॅथन कुल्टर नाईलनं केला आहे.

ऑफ स्टम्पच्या लाईनमध्ये इन स्विंग टाकून आणि शॉर्ट पिच बॉलिंग टाकून आम्ही रोहितची परीक्षा घेऊ, असं कुल्टर नाईल म्हणालाय. रोहित हा जगातला शानदार खेळाडू आहे. पण नव्या बॉलनं आम्हाला त्याच्याविरुद्ध यश मिळालं आहे. मागच्यावेळी जेसन बेहरनडॉर्फनं त्याला एलबीडब्ल्यू आऊट केलं होतं.

मागच्या वर्षी गुवाहाटीमध्ये डावखुरा फास्ट बॉलर जेसन बेहरनडॉर्फनं भारतासमोर अडचणी निर्माण केल्या होत्या. बेहरनडॉर्फनं २१ रन देऊन भारताच्या ४ विकेट घेतल्या होत्या. यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा समावेश होता.

Nathan Coulter Nile

सुरुवातीला बॉलिंग करणं हा एक चांगला पर्याय आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आम्ही इकडे बॉल स्विंग होईल. आज परिस्थिती चांगली आहे. मॅचच्या दिवशीही तशीच परिस्थिती असेल, त्यामुळे आम्ही बॉल स्विंग करू. मिळालेल्या संधीचा आम्ही नक्कीच फायदा घेऊ, असा विश्वास कुल्टर नाईलनं व्यक्त केला आहे.

रोहितची प्रतिक्रिया

मला ऑस्ट्रेयिलात खेळायला आवडतं. जेव्हा जेव्हा मी ऑस्ट्रेलियात आलो तेव्हा मी इकडे खेळणं एन्जॉय केलं. यावेळीही मला क्रिकेट एन्जॉय करायचंय आणि मॅच जिंकायच्या आहेत, असं रोहित म्हणाला.

ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवणं कठीण आहे. पण आम्हाला सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करावं लागेल. आमच्याकडे सर्वोत्तम स्पिनर आणि फास्ट बॉलर आहेत. जे ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनना आव्हान देतील, असं रोहित म्हणाला. यावेळी सर्वोत्तम कामगिरी करून आम्हाला जिंकायचं आहे. ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केल्यामुळे आत्मविश्वास वाढतो. याचा फायदा वर्ल्ड कपमध्ये निश्चित होईल, असं रोहितला वाटतंय.

खलील अहमदनं आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. यापुढेही त्याला संधी मिळाली तर तो याचीच पुनरावृत्ती करेल, अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया रोहित शर्मानं दिली. २१ नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. ३ टी-२० मॅचच्या सीरिजपासून भारताचा हा दौरा सुरु होईल. टी-२० सीरिजनंतर भारत ४ टेस्ट आणि ३ वनडे मॅचची सीरिज खेळेल. 

विराटवर विश्वास नाही, ऑस्ट्रेलियाच्या मैदानाबाहेरच्या खेळाला सुरुवात